भिगवण - भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगसारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदूषित आहारामुळेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे. आहारातील प्रदूषणाबरोबरच विचारांचेही प्रदूषण सजग समाजासाठी धोकादायक आहे. सजग, संवेदनशील व निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी चुकीचा आहार व चुकीच्या विचारांचे होत असलेले प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जैन मुनी अरुणविजयजीमहाराज यांनी केले.भिगवण येथील सकल जैन समाजाच्या वतीने जैन स्थानकांमध्ये महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास हेमंतमुनी महाराज, भिगवण जैन संघाचे अध्यक्ष अभय रायसोनी, उपाध्यक्ष मनोज मुनोत, अशोक रायसोनी, विजयकुमार बोगावत, महेंद्र बोगावत, कमलेश गांधी, राहुल गुंदेचा, संदीप बोगावत आदी उपस्थित होते. श्री अरुणविजयजीमहाराज म्हणाले, कर्करोग हा केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो, हा गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे.या वेळी गार्इंची कत्तलखान्यापासून सुटका करण्यासाठी अशोक रायसोनी, अभय रायसोनी, संदीप बोगावत, कमलेश गांधी, विजय रायसोनी, संजय रायसोनी, चैनसुख बोरा, लालचंद रायसोनी, उमाकांत रायसोनी व योगेश ललवाणी यांनी प्रत्येकी एक गाय पुणे येथील विरालय गोशाळेस भेट देण्याचे जाहीर केले. तसेच जैनस्थानकांमधील कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिकचा वापर न करण्याचा संकल्पही करण्यात आला. सचिन बोगावत यांनी प्रास्ताविक केले. राहुल गुंदेचा यांनी सूत्रसंचालन केले. संजय रायसोनी यांनी आभार मानले. नियोजन सचिन बोगावत, किरण रायसोनी, विशाल गांधी, केतन बोरा, हर्षद रायसोनी, निखिल बोगावत, शुभंम बोरा आदींसह सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले.सध्या कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ५४ टक्के प्रमाण महिलांचे आहे. अन्न शिजविताना वापरलेली भांडी, प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर, तसेच जंकफूड यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुद्ध व सात्विक आहार व शुद्ध विचाराची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यासाठी आहारातील भेसळ व विचारांमधील प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे.
देशात कर्करोगामुळे ७० लाख रुग्णांचा मत्यू -अरुणविजयजीमहाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 3:14 AM