पुणे : मुलाला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन मिळवून देतो, असे सांगून तब्बल ७० लाखांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनील नामदेव गडकर (वय- ३२, रा. आंबेगाव बुद्रुक) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हा प्रकार २९ नोव्हेंबर २०२३ ते १३ एप्रिल २०२४ या कालावधीत घडला आहे. याबाबत राजेंद्र विठ्ठल बहिरट (वय- ६०, रा. कसबा पेठ) यांनी रविवारी (दि. १३) विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुनील गडकर याने फिर्यादीची भेट घेऊन मुलाला एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यासाठी आरोपीने सही केलेला कोरा चेक देऊन फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ऍडमिशन घेण्याच्या बहाण्याने फॉर्म फिलींग, इन्व्हाईस तिकीट, रजिस्ट्रेशन प्रोसेस, कॉलेज फी, डिपॉझीट फी अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादींकडून ऑनलाईन ५८ लाख ७९ हजार आणि १० लाख ९० हजार रोख असे एकूण ६९ लाख ७० हजार रुपये उकळले. मात्र पैसे दिल्यानंतरही आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाचे ऍडमिशन करून दिले नाही. विचारणा केली असता वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून फिर्यादींनी पैसे परत दे असे सांगितल्यावर फोन उचलणे बंद केले. म्हणून सुनिल गडकर याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर करत आहेत.