अवघ्या दोन तासात झाली ७०० किलो तूर डाळीची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:35 PM2018-05-08T16:35:27+5:302018-05-08T16:35:27+5:30
शासनातर्फे करण्यात आलेल्या बिगरपॉलिश आणि रास्त भावातील तूरडाळ खरेदीला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून पुण्यात अवघ्या दोन तासात ७०० किलो डाळीची विक्री झाल्याचे दिसून आले.
पुणे :शासनातर्फे करण्यात आलेल्या बिगरपॉलिश आणि रास्त भावातील तूरडाळ खरेदीला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून पुण्यात अवघ्या दोन तासात ७०० किलो डाळीची विक्री झाल्याचे दिसून आले. बाजारभावापेक्षा सुमारे ५ ते १५ रूपयांनी स्वस्त असून त्याचा फायदा अनेकजण घेत आहेत.
महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड व पुणे विभागीय सहकारी खाते पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील भूविकास बॅंकेजवळ डाळ विक्री सुरु आहे. दोन वर्षापुर्वी वर्षी राज्यात तुरदाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रूपये किलो दराने तुरदाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबाबदार धरले होते तर सरकारनेही या संकटावर मात करण्यासाठी तुरदाळ आयात केली होती, त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तुरदाळीने कधी नव्हे इतका भाव खाल्याने सरकारने तुरदाळ लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत तर केलेच परंतु तुरीला मिळणारा भाव पाहून गेल्या वर्षी तुरदाळीच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाली. परिणामी यंदा तूर डाळीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे भाव गडगडले आणि सरकारला हमीभावाने शेतकऱ्यानांकडून तूर खरेदी करावी लागली. यातील तुरीवर प्रक्रिया करून त्याची डाळ करण्यात आली.
त्यानंतर ५५ रुपये किलो दराने शासकीय कर्मचाऱ्यांना डाळीची विक्री करण्यात येत आहे. ही संधी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना उपलब्ध असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या ५२ रुपये ५० पैसे दराने डाळ घेऊन विकण्यास परवानगी आहे. एका कर्मचाऱ्याला ५ ते २० किलोच्या दरम्यान खरेदी करण्यास मुभा आहे. सरकारी कर्मचारी आहेत मात्र रेशनकार्ड धारक नाहीत त्यांना या खरेदीचा फायदा होणार आहे.पुण्यात त्यातील सुमारे १० टन डाळ विक्रीस उपलब्ध आहे. आज करण्यात आलेल्या खरेदीमध्ये शहरातल्या विविध अंगणवाड्या, शालेय पोषण आहार यांच्यातर्फेही खरेदी करण्यात येते. याशिवाय फक्त येरवडा कारागृह प्रशासनाने ६०००किलो डाळीची खरेदी केली. कैद्यांसाठी वर्षभर ही डाळ वापरण्यात येणार आहे.