सासवड मध्ये महसूल विभागाच्या छाप्यात ७१ गॅस सिलेंडर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:56 PM2019-04-12T18:56:21+5:302019-04-12T18:57:34+5:30
चंदन टेकडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे सिलेंडर असल्याची गोपनीय माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती.
सासवड: पुरवठा विभागातर्फे सासवड मधील चंदन टेकडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे साठविलेल्या घरगुती वापराचे ७१ सिलेंडर जप्त करण्यात आले. यावेळी ३५ भरलेल्या तर ३६ रिकामे गॅस सिलेंडर असा सुमारे १ लाख ३५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी पुरंदरचे पुरवठा निरीक्षक सुधीर बबन बडदे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याबाबत पोलिसांनी अवधूत महेश खोपडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदरचे तहसीलदार यांना सासवड मधील चंदन टेकडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर पणे साठविलेल्या घरगुती वापराच्या सिलेंडर टाक्या असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पुरवठा निरीक्षक सुधीर बडदे यांच्यासह सासवडचे मंडलाधिकारी आर ए भामे, तलाठी बी एस ढमढेरे यांनी पंचासमक्ष प्रत्यक्षात त्या जागेवर जात पाहणी केली. त्यावेळी त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये गो गॅस कंपनीच्या सुमारे ७१ टाक्या आढळून आल्या. त्यावेळी तेथे असलेल्या अवधूत खोपडे याकडे अधिक माहिती विचारली असता याबाबत कोणतीही माहिती दिली नाही..मात्र , त्याच्याकडे गॅसचा साठा करण्याची परवानगी नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
————————————————————
यापूवीर्ही सासवडमध्ये अनधिकृतपणे साठा केलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट होवून एक जण जखमी झाला होता. त्यावेळी तब्बल ४० हून अधिक बेकायदा गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले होते. त्यामध्ये गॅस वितरकाचाच थेट संबंध आल्याने प्रकरण दडपण्यात आले. यानंतरही बेकायदा गॅस सिलेंडर चा साठा व वितरण होत असून यापूर्वी महसूल पुरवठा विभागाला तक्रारी करून देखील कारवाई करण्यात येत नव्हती. निवडणूक काळातच अचानक सर्व प्रशासकीय यंत्रणा कशी काय सक्रिय होते. इतरवेळी का दुर्लक्ष होते हे सामान्य नागरिकांना न उलगडलेले कोडे आहे.