पुणे : सायबर चाेरट्यांनी आता नवीनच फंडा शाेधून काढला आहे. ओएलएक्सवर खरेदीसाठी चुकून जादा पैसे पाठविल्याचे स्क्रीन शॉट पाठवून त्यातून खरेदी केलेल्या वस्तूंची रक्कम वजा करुन उरलेले पैसे परत करण्यास सांगत आहेत. असाच प्रकार घडला आहे. ओएलएक्सवर कपाट विक्रीच्या पोस्टला प्रतिसाद देऊन चुकून ८ लाख रुपये पाठविल्याचा स्क्रीन शॉट पाठवून सायबर चोरट्याने एका महिलेची तब्बल ७ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत हडपसर येथील ॲमनोरा पार्क टाऊन मधील एका ३७ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आदिल फारुखभाई शेख याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेने घरातील कपाट विक्रीबाबत ओएलएक्स साईटवर पोस्ट टाकली होती. त्याला आरोपीने प्रतिसाद देऊन ते कपाट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. फिर्यादींकडून बँक खात्याची माहिती घेतली. काही वेळाने फिर्यादी यांना फोन करुन माझ्याकडून तुमच्या खात्यावर चुकून ८ लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत, ते परत पाठवा, असे सांगून त्याबाबत ८ लाख रुपयांचे स्क्रीन शॉट फिर्यादी यांना पाठविले. त्यावर विश्वास ठेवत कपाटाची रक्कम वजा करुन आरोपीच्या बँक खात्यावर ७ लाख ६५ हजार रुपये परत पाठविले. त्यानंतर फिर्यादी यांनी बँकेत आरोपीने पाठविलेल्या पैशांची चौकशी केली असता अशा प्रकारे कोणतीही रक्कम खात्यावर पाठविली नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला फोन केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.