शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १० नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच दि. १८ जानेवारी २०२१ च्या शासननिर्णयानुसार इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार दि. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. तसेच इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झाले नसले तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण चालू असल्याने शासनाने विद्यार्थ्यांची शालेय उपस्थितीची अट शिथिल करून सर्व पात्र विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या दि. १७ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे सदर योजना ही ग्रामविकास व नगरविकास विभाग यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ या तालुक्यांतील एकूण १७२ गावे आदिवासी क्षेत्रात येत असून, यातील सर्व शाळांमध्ये तसेच बिगर आदिवासी भागातील अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येतो.