पुणे : समाज कल्याण विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करण्याची मुदत काही दिवसांवर आलेली असताना जिल्ह्यातील सुमारे ८ हजार एससी संवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थात्मक पातळीवर प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी पुढील येत्या २ दिवसांत अर्जांची तपासणी करून समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. तसेच सर्व विद्यार्थ्यांनीसुध्दा आपले बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करून घ्यावे, असे आवाहन पुणे विभागीय समाज कल्याण सहसंचालक कार्यालयातर्फे केले आहे.
पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एस. सी. संवर्गातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत डीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज केले आहेत. तसेच महाविद्यालयाकडे आवश्यक कागदपत्र सादर केले. मात्र, मार्च महिना संपत आला तरीही काही महाविद्यालयांनी स्वत:कडे प्रलंबित असलेल्या अर्जांची तपासण्याची प्रकिया पूर्ण केली नाही. त्यामुळे समाज कल्याण विभागाने दिलेल्या मुदतीत अर्ज प्राप्त झाले नाहीत तर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती केव्हा मिळणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
---
पुणे जिल्ह्यातील एस. सी. संवर्गातील ३९ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली. त्यातील ६ हजार ३० विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत, तर ४ हजार २ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करून शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यासाठी बँकेकडे पाठविले आहेत.
--
महाविद्यालय स्तरावरून २० हजार ४२७ अर्ज मंजूर केले असून, ९० विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले आहेत, तर ८ हजार ६७३ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत.
--
डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, समाज कल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे बंधनकारक आहे. आधारकार्ड बँकेशी लिंक नसेल तर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही, असे समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.