लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समाजामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक व बालक यांच्यावर लैंगिक, भावनिक, मानसिक, आर्थिक स्वरुपाचा अत्याचार होत असतो. यात बळी पडलेल्यांना अत्याचाराविरुद्ध लढण्याकरिता योग्य मार्गदर्शन व मदत एकाच ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न पुणे शहर पोलीस दलाने भरोसा सेलमार्फत केला आहे. या भरोसा सेलचा दुसरा वर्धापन दिन शनिवारी उत्साहात साजरा झाला.
भरोसा सेलच्या समुपदेशिका प्रार्थना सदावर्ते यांनी भरोसाच्या कामावर आधारित लिहिलेल्या आधुनिक पसायदान या कवितेच्या फलकाचे अनावरण पोलीस उपायुक्त बच्च्नसिंह यांच्या हस्ते करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. सर्व समुपदेशकांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या वर्धापन दिन कार्यक्रमाला सहायक निरीक्षक सुजाता शानमे, स्वाती केदार, समुपदेशक प्रार्थना सदावर्ते, मीनल पोरे, रश्मी जोशी, लीना पाटील, अनुजा पाटील, शुभांगी कदम तसेच भसोरा सेलमधील सर्व अंमलदार, दामिनी पथक उपस्थित होते.
........
महिला साह्य कक्षात २०२० मध्ये २ हजार ७३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८०७ अर्जांमध्ये समझोता घडवून आणून त्यांचे संसार पुन्हा जुळविले. ८०० अर्जांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. महिलांच्या मदतीसाठी १०९१ ही हेल्पलाईन आहे. त्यावर एकूण ९४० कॉल प्राप्त झाले होते.
१२१९ छेडछाड विरोधात कारवाई
गर्दीची ठिकाणे, शाळा, कॉलेज या ठिकाणी प्रभावीपणे प्रेट्रोलिंग करण्यासाठी दामिनी पथक नेमले आहे. दामिनी पथकाने गेल्या वर्षभरात छेडछाडीच्या १ हजार २१९ प्रकरणात कारवाई केली. रस्त्यावर भिक्षा मागणा-या ७७७ जणांवर कारवाई केली. २ हजार ३९ विशेष कारवाई, ६६८ संयुक्त कारवाई, नियंत्रण कक्षातून आलेल्या ४ हजार ४३ कॉलवर कारवाई केली. १ हजार ९२१ ठिकाणी जनजागृती करण्यात आली.
बाल पथकाकडून २१९ विधीसंघर्षित बालकांची गृहभेट घेऊन त्यांचे समुपदेशन केल. ६१ विधीसंघर्षित व ५८ इतर मुलांना कार्यालयात समुपदेशन केले गेले. ३ बाल मेळावे घेण्यात आले. ५०२ विधीसंघर्षित बालकांचे फोनद्वारे समुपदेशन करण्यात आले.