Pune | पुण्यात रस्त्यांच्या कामात ९ कोटींचा अपहार; प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:18 PM2022-12-05T12:18:59+5:302022-12-05T12:20:01+5:30
हा प्रकार २०१६ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडला...
पुणे : कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करीत असताना रस्त्याच्या कामातील डिझेल, डांबर, लोखंड, खडी अशा विविध घटकांमध्ये अपहार करून ९ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बृजेंद्रकुमार इंद्रदेव सिंह (वय ४२, रा. एनआयबीएम रोड) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शाम अशोक निकम (रा. शिंगणापूर, अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१६ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडला.
अधिक माहितीनुसार, शाम निकम हे फिर्यादींच्या रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होते. त्यावेळी खेड-सिन्नर बायपास, म्हसवड-पिलीव्ह, पंढरपूर, कुर्डुवाडी-पंढरपूर, सातारा- रहिमतपूर अशा प्रकल्पांवर काम करत होते. त्या काळात डिझेल, डांबर, लोखंड, खडी, बोल्डर, पॅनल रिप्लेसमेंट असा एकूण ९ कोटी ८ लाख ६ हजार ३५५ रुपयांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केली. सहायक पोलिस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.