Pune: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निमगाव केतकीच्या सरपंचासह चार जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 04:15 PM2024-03-08T16:15:32+5:302024-03-08T16:16:20+5:30
निमगाव केतकीचे विद्यमान सरपंच प्रविण डोंगरे, सुनंदा डोंगरे, मंगेश कुदळे आणि सुनिता भोंग अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत....
निमगाव केतकी (पुणे) : निमगाव केतकी येथील पतसंस्थेत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या कर्मचार्याच्या आत्महत्येस कारणीभुत ठरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमान सरपंचासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ वडापुरे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर अंकुश वडापुरे (वय ३३) असे आत्महत्याग्रस्त व्यक्तीचे नाव आहे. तर निमगाव केतकीचे विद्यमान सरपंच प्रविण डोंगरे, सुनंदा डोंगरे, मंगेश कुदळे आणि सुनिता भोंग अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आत्महत्याग्रस्त सागर वडापुरे हा गेल्या दोन वर्षापासून निमगाव केतकी येथील सुवर्णयुग पतसंस्थेत कामाला होता. त्याला ड्रायव्हिंगचे काम येत असल्याने तो चारचाकी गाडीवर ड्रायव्हर म्हणुनही काम करत होता. फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की, आरोपी यांनी आत्महत्याग्रस्त सागर वडापुरे याच्यावर मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीचा आरोप करून त्याला कामावरून काढले होते. त्याला फोन करून तसेच गावात बदनामी करुन वेळोवेळी मानसिक त्रास दिला जात होता.
व्याजाच्या पैशासाठीही त्याच्याकडे तगादा लावला जात असल्याने सतत होणाऱ्या बदनामीला कंटाळून सागर वडापुरे याने (दि.२ मार्च) शनिवार रोजी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. अशी फिर्याद मयत सागर वडापुरे याचा भाऊ सोमनाथ वडापुरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे दिले असून या तक्रारी नुसार वरील सर्व आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसून पुढील तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करत आहेत.