पुणे : शेतीच्या सात बारा उताऱ्यावर नावाची नोंद पुर्न:स्थापित करण्यासाठी खासगी व्यक्तीच्या हस्ते ७ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी थेऊर येथील मंडल अधिकारी जयश्री कवडे, मध्यस्थ योगेश कांताराम तातळे (२२, रा. चौधरी पार्क, बाळू कदम पार्क, दिघी) आणि मध्यस्थ विजय सुदाम नाईकनवरे (३८, रा. नागपूर चाळ, येरवडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २५ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांच्या खापर पणजोबा (आजीच्या आईचे वडील) यांचे हवेली तालुक्यातील कोलवडी येथे असलेल्या शेतजमिनीच्या सात बारा उताऱ्यावरील नाव कमी झाल्याचे दिसून आले होते. या नावाची नोंद पुर्न:स्थापना करण्यासाठी तक्रारदार यांच्या आजी आणि त्यांच्या बहिणींनी हवेली तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. यानंतर हवेली तहसीलदार यांनी सात बारा उताऱ्यावर तक्रारदार यांच्या खापर पणजोबांच्या नाव नोंदणीसाठी कोलवाडी येथील गाव कामगार तलाठी व थेऊर येथील मंडल अधिकारी यांना आदेश दिले होते. यानंतर तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदार हे थेऊर मंडल अधिकारी कार्यालयात जाऊन मंडल अधिकारी जयश्री कवडे यांना भेटले. यावेळी जयश्री कवडे यांनी खासगी व्यक्ती विजय नाईकनवरे यांना भेटायला सांगितले. यावेळी खासगी व्यक्ती विजय नाईकनवरे याने खापर पणजोबांची नोंद मंजूर करण्यासाठी १० हजारांची लाच मागितली. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. यानंतर सापळा रचून जयश्री कवडे यांच्यासाठी तडजोडीअंती ७ हजारांची लाचेची मागणी योगेश तातळे, विजय सुदाम नाईकनवरे यांनी केली. त्यानंतर सापळा लावून लाच घेणाऱ्या नाईकनवरेला पकडले. जयश्री कवडे यांनी खासगी व्यक्ती योगेश तातळे, विजय सुदाम यांना लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश तातळे आणि विजय सुदाम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपाधीक्षक माधुरी भोसले करत आहेत.