पुण्यात सराईत गुन्हेगाराचा टोळक्याकडून दगडाने ठेचून खून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 11:52 AM2022-04-14T11:52:06+5:302022-04-14T11:55:05+5:30
खुनाची घटना समजताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते...
पुणे : येरवडा कारागृहात नुकताच सुटलेल्या मोक्कातील गुन्हेगाराचा कोयता, पालघन व दगडाने ठेचून खून करण्यात आला. या घटनेत त्याचा साथीदारही गंभीर जखमी झाला. सनी ऊर्फ गिरीश महेंद्र हिवाळे (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे, तर परवेज ऊर्फ सोहेल हैदरअली इनामदार (वय २०, रा. तिरंगा चौक, हडपसर) हा गंभीर जखमी झाला. ही घटना काळेपडळ हडपसर येथील म्हसोबा मंदिरासमोरील सार्वजनिक रोडवर मंगळवारी रात्री घडली.
याबाबत सनीच्या आईने फिर्याद दिली आहे. सचिन नवले, आकाश कसबे, राहुल कोळी, आकाश काकडे, गोट्या लोहार, संकेत पांडवे, आकाश कोटावळे (सर्व रा. काळेपडळ, हडपसर) यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तो ९ एप्रिल रोजी कारागृहातून बाहेर आला होता. सनी व सोहेल हे दोघेही कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना भेटायला त्यांची मित्रमंडळी काळेपडळ येथील म्हसोबा मंदिर चौकात येत होती. यामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या राहुल कोळी व आकाश काकडे यांचा त्यांच्यावर रोष होता. त्यांनी सनी व सोहेल यास काळेपडाचे भाई होताय का? तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, मंगळवारी सनी व सोहेल दोघे चौकात बसले असताना आरोपी त्यांच्या साथीदारांना घेऊन तेथे आले. त्यांनी कोयता, पालघन आणि लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करत दोघांना गंभीर जखमी केले. यामध्ये सनीचा जागेवरच मृत्यू झाला.
खुनाची घटना समजताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. गुन्ह्याचा तपास गुन्हे निरीक्षक सावळाराम साळगावकर करीत आहेत.
सनी विरुद्ध एक खुनाचा, चार खुनाच्या प्रयत्नाचा, आर्म ॲक्ट आदी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर फेब्रुवारी २०२१ मध्ये मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो ९ एप्रिल २०२२ रोजी कारागृहातून सुटला होता. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याचा अंदाज पोलिसांंनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी काही जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे, तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.