दहाव्या मजल्यावरून पडला मजूर, जिवानिशी गेला; ठेकेदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:03 AM2024-01-17T10:03:13+5:302024-01-17T10:04:24+5:30
दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध चंदननगर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला...
पुणे : नियोजित गृहप्रकल्पाचे काम करताना दहाव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. निकृष्ट दर्जाच्या सेफ्टी जाळ्या बसविल्याने ९ व्या, ७ व्या, ५ व्या, तसेच दुसऱ्या मजल्यावरील या जाळ्या तुटून पहिल्या मजल्यावर पडून या मजुराचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध चंदननगर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
बिश्वनाथ खुदीराम बिश्वास (वय ३१) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. बिश्वासचा भाऊ अभिजित (वय ३२, रा. लेबर कॅम्प, खराडी) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ठेकेदार फहिम उस्मान शेख (वय ३३, रा. संजय पार्क, लोहगाव) आणि दीपन देवास समाजदार (वय ३६, रा. वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्वनाथ, सहकारी मजूर सरदार, सुशांतो, भौमिक खराडीतील एका नियोजित गृहप्रकल्पात काम करत होते. त्यावेळी बिश्वास हा १० व्या मजल्यावर किचन रूममधील सेंट्रिंग खोलण्याचे काम करीत होता. त्यावेळी तोल जाऊन बिश्वनाथ थेट डक्टमध्ये खाली पडला. डोक्याला गंभीर जखमी झालेल्या बिश्वनाथचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. ठेकेदारांना नियोजित गृहप्रकल्पातील मजुरांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययाेजना केल्या नाहीत, तसेच निकृष्ट दर्जाची सुरक्षा जाळी तुटून खाली पडल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक खांडेकर तपास करत आहेत.