वेल्हे : पानशेतजवळील वरघड येथे दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या रिक्षावर रानडुकराने हल्ला केल्याने रिक्षा चारशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एक भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालकासह तिघे जखमी झाले.
भागूजी धाऊ मरगळे (वय ६०, सध्या राहणार नसरापूर, मूळ रा. शिरकोली, ता.वेल्हे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. मरगळे यांचा चुलत पुतण्या पांडुरंग धाऊ मरगळे (वय ४५, रा. शिरकोली, सध्या राहणार डोणजे) हा गंभीर झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी रिक्षाचालक सुरेश कोंडीबा ढेबे (रा. पोळे) व अशोक बबन मरगळे (वय ३१, रा. शिरकोली) अशी इतर दोन जखमींची नावे आहेत. भागूजी मरगळे यांचा जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच स्थानिक नागरिकांपाठोपाठ वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार सुदाम बांदल, पोलिस जवान ज्ञानेश्वर शेडगे व वैजनाथ घुमरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. रिक्षा कोसळलेल्या ठिकाणी जाण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने कोणालाही दरीत उतरता येईना. त्यामुळे पोलिस फौजदार बांदल यांनी मावळा जवान संघटनेचे गिर्यारोहक रेस्क्यू ऑपरेशन पथकाचे तानाजी भोसले यांच्याशी संपर्क साधला. तेथून भोसले हे एकटेच अर्धा तासात घटनास्थळी दाखल झाले. क्षणाचाही विलंब न करता मध्यरात्री दीड वाजता काळोखात स्थानिक युवकांच्या साथीने भोसले यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आणि पहाटे ४ वाजता पूर्ण केले.
दुर्घटनेत मृत्यू व जखमी झालेले कष्टकरी शेतकरी आहेत. गंभीर जखमी पांडुरंग मरगळे हे डोणजे येथे मजुरी करतात. त्यांच्या मजुरीवरी आठ माणसांचा उदरनिर्वाह होत होता. वनविभागाने सुधारित शासन निर्णयानुसार अपघातग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शिरकोली गावचे सरपंच अमोल पडवळ व मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष रोहित नलावडे यांनी केली आहे.