पुणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात शास्त्रीय नृत्याचा समावेश करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून आम्ही एक व्हिडिओ पाठवला. देशभरातील १७०० व्हिडिओंमधून आमचा व्हिडिओ पहिल्या पाच क्रमांकात निवडला गेला आणि त्याचे संपूर्ण नृत्यदिग्दर्शन करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. ही माझ्यासाठी खूप अभूतपूर्व व अभिमानाची गोष्ट असल्याची भावना कथक नृत्यांगना तेजस्विनी साठे हिने ’लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच शास्त्रीय नृत्याचा समावेश करण्यात आला आहे आणि त्याच्या नृत्यदिग्दर्शनाची संपूर्ण जबाबदारी तेजस्विनी साठे हिच्याकडे आहे. त्याविषयी सांगताना तेजस्विनी म्हणाली, सुरूवातीला मी थोडी निराश झाले होते. कारण मी स्वत: परफॉर्म करू शकणार नव्हते. त्यासाठी त्यांनी 15 ते 35 असा वयोगट दिला होता. मग माझ्या ग्रृपचा व्हिडिओ पाठविला. त्यांची मुंबईला निवड झाली. त्यानंतर झोनलला त्यांची निवड झाली. देशभरातील १७०० व्हिडिओंमधून 480 व त्यातूनही 70 व्हिडिओ निवडले गेले. खूप आव्हानात्मक स्पर्धा होती. सत्तरमधील पहिल्या पाचमध्ये आमचा ग्रृप निवडला गेला. सांस्कृतिक मंत्रालयाने त्यासाठी मला नृत्यदिग्दर्शन करायला बोलावले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचे ती म्हणाली.
तेजस्विनी साठे ठरली महाराष्ट्रातील एकमेव नृत्यदिग्दर्शिका
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादर होणारी ही नृत्यसंरचना १२ मिनिटांची असून विविधतेतील एकता ही संकल्पना आहे. त्यामध्ये कथ्थकसह भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथाकली, ओडिसी, मणिपुरी, कुचिपुडी अशा अन्य भारतीय नृत्यशैलींचाही समावेश आहे. तसेच लोकनृत्य आणि आदिवासी नृत्याचाही अंतर्भाव आहे. प्रसिद्ध संगीतकार रिकी केज आणि विक्रम घोष यांनी दिलेल्या संगीताने ही नृत्यसंरचना सजली आहे. देशभरातील ५१२ नृत्यकलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. चारपैकी तीन नृत्य्दिग्दर्शक दिल्लीमधील असून, तेजस्विनी साठे ही एकमेव महाराष्ट्रातील नृत्यदिग्दर्शक आहे.