पुणे : नवरात्रोत्सवात तोरण अर्पण करण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आला. ही घटना सेनापती बापट रस्त्यावर श्री चतु:शृंगी मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी सराइतांसह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अनिकेत चांदणे (वय २१), प्रज्योत उर्फ माेन्या उमाळे (वय २२), हर्षद चांदणे (वय २०), प्रतीक फाळके (वय २२), यश उर्फ मोन्या गोपनारायण (वय २०), आयुष उर्फ बंट्या लांडगे (वय १९), प्रणय उर्फ पापू गोगले (वय १९), ऋषी बिवाल उर्फ खोड (वय १९, सर्व रा. खडकी बाजार) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत आशिष ननावरे (वय १९, रा. सुरती मोहल्ला, खडकी बाजार) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
ननावरे याने याबाबत चतु:शृंगी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गोपनारायण आणि बिवाल सराइत गुन्हेगार आहेत. दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यरात्री ननावरे, त्याचा मामा विजय तायडे आणि परिसरातील तरुण खडकी बाजार येथून श्री चतु:शृंगी मंदिरात तोरण अर्पण करण्यासाठी आले होते. आरोपींशी ननावरेची काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. मंदिरातून दर्शन घेऊन निघाल्यानंतर सेनापती बापट रस्त्यावर टोळक्याने ननावरेला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. कोयते उगारुन आरोपींनी दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके तपास करत आहेत.