चर्चा तर होणार ना! तब्बल १२५ फुटी आणि साड़े सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेला 'बॅनर'
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: December 14, 2020 02:20 PM2020-12-14T14:20:52+5:302020-12-14T14:30:24+5:30
याआधीही पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात झालीय भन्नाट बॅनरबाजी....
पुणे : आजकाल प्रसिद्धी कुणाला नको असते. तसेच मिळेल तितकी प्रसिद्धी देखील सध्याच्या युगात कमीच असते. त्यात राजकारण क्षेत्र असेल तर मग काही विचारता सोय नाही. आपली सर्वत्र चर्चा झालीच पाहिजे या उद्देशाने प्रत्येकजण झपाटलेला असतो. आणि त्यात पुणे म्हटलं की भन्नाट रसायन पाहायला मिळणार हे अगदी ठरलेले असते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अशाच एक प्रसिद्धीचा हटके फंडा चर्चेचा विषय ठरतो आहे.
जुन्नर तालुक्यात एका राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने तब्बल १२५ फूट आकाराचा भव्यदिव्य बॅनर झळकवला आहे. तसेच यापुढील आश्चर्य म्हणजे त्यावर ६ हजार ५०० समर्थकांचे फोटो छापले आहे.त्यामुळे हा बॅनर परिसरात चर्चेचा विषय ठरतो आहे.स्थानिक पातळीवरील पब्लिसिटी स्टंट असल्याचे पण बोलले जात आहे. तसेच बॅनरवर राजकीय वजन दाखवण्यापेक्षा सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटायला हवा असे मत देखील काही नागरिक व्यक्त करत आहे.
हल्ली जिल्हा, तालुका , गाव पातळीवर देखील राजकारणाचे स्वरूप बदलले आहे. पक्षनिष्ठा, संयम, शिस्त वगैरे हे सगळे शब्द भाषणापुरते मर्यादित राहिले आहे. आदल्या रात्री एखाद्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता उद्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर दिसला तर नवल वाटत नाही. प्रत्येकाला कमी वेळेत साहेबांच्या मर्जीतले होऊन आपले राजकीय स्थान मजबूत करायचे आहे. त्यामुळेच जो तो आपल्या कार्यकर्त्यांची मने जपण्याचा प्रयत्न करत असतो.
याआधीही पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात झालीय भन्नाट बॅनरबाजी....
याआधीही पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात भन्नाट बॅनरबाजी झालेली आहे.त्यात बस स्टॉपची चोरी, नगरसेवक गायब, प्रेयसीचे नाव लिहून प्रेमाची कबुली देणारे, वा माफी मागणाऱ्या अशा काही बॅनरचा समावेश आहे. पुणेकरांनी नेहमीच 'हटके' फंडे वापरून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा १२५ फुटी व साडे सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेल्या बॅनरची त्यात भर पडली आहे. तसेच या बॅनरवर प्रशासन काही कारवाई करते का दुर्लक्ष करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.