पुणे : कामशेत ते तळेगावदरम्यान कान्हे फाटाजवळ पुण्याच्या दिशेने रेल्वेमागार्ला असलेला थोडासा चढ मालगाडीला पेलवला नाही. या चढावरून जाताना मालगाडीच्या चाकांचे घर्षण होऊन सुमारे १५ मीटरच्या रेल्वेरुळाची झीज झाली. ही झीज एवढी होती की, त्यामुळे काही ठिकाणी रुळाचा आकारच बदलून गेला. ही बाब मालगाडी चालका (लोको पायलट)च्या निदर्शनास आल्याने त्याने नियंत्रण कक्षाला कळविले. त्यामुळे तातडीने हा मार्ग असुरक्षित घोषित करून पुढील वाहतुक बंद करण्यात आल्याने अनर्थ टळला.रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर ही घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुक अडीच ते तीन तास खोळंबली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथून आलेली मालगाडी पुण्याच्या दिशेने निघाली होती. सायंकाळली साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही गाडी कान्हे फाटा जवळ येते. या भागात पुण्याच्या दिशेने रेल्वेमागार्ला थोडासा चढ आहे. या चढावरून मालगाडीचे काही डबे पुढे गेल्यानंतर चाके आणि रुळामध्ये घर्षण सुरू झाले. मालगाडीमधील सामानाचे वजन अधिक असल्याने हा चढ चढताना रूळाची जास्त झीज होऊ लागली. सुमारे १५ ते १६ मीटरच्या रुळादरम्यान काही ठिकाणी घर्षणामुळे लोखंड वितळून गेले. त्यामुळे रुळाला बाक (कर्व्ह) तयार झाला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर मार्गावरील वाहतूक तातडीने थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.चालकाने प्रसंगावधान दाखविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मालगाडीनंतर मागून लोकल व एक्सप्रेस गाड्या येणार होत्या. पण वाहतुक बंद केल्याने या गाड्यांना मध्येच थांबविण्यात आले. या गाड्या आल्या असत्या तर डबे रुळावरून घसरण्याचा धोका होता. काही वेळाने रेल्वेचे अधिकारी व कर्मचाºयांनी रेल्वेरुळ दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले. सुरूवातीला ठिकठिकाणचा रेल्वेरुळाचा काही प्रमाणात बाक आलेला भाग घासून सरळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागला. यादरम्यान प्रगती, सह्याद्री, सिंहगड, डेक्कन क्वीन, चेन्नई एक्सप्रेस यांसर अन्य काही एक्सप्रेस व लोकल गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या होत्या. त्यांना आणखी विलंब होऊ नये म्हणून याठिकाणाहून धीम्या गतीने त्यांना सोडण्यात आले. रात्री उशिरा या ठिकाणच्या रुळाचा भाग संपूर्णपणे बदलण्यात आला, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
.......
कान्हे फाटाजवळ रविवारी सायंकाळची घटना.. घाटमार्ग किंवा काही ठिकाणी चढ असलेल्या मार्गावर रेल्वेरूळाचे घर्षण होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. पण रविवारी मोठ्या प्रमाणावर रुळाची हानी झाली होती. रूळाला बाक पडल्याने डबे घसरण्याच्या धोका होता. असे प्रकार सहसा होत नाहीत. उन्हामुळे हे घर्षण झाले नाही. त्यामुळे वाहतुक बंद करावी लागली, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.