पुणे : धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्ग असणाऱ्या ३८, ३९ आणि ४० या प्रभागांतील १२ जागांपैकी ८ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवित भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या बालेकिल्ल्यात बाजी मारली. उर्वरित चार जागांपैकी ३ जागा भारतीय जनता पक्षाने, तर एक जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राखली. आमदारांचा पुतण्या अभिषेक तापकीर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किशोर धनकवडे यांनी तब्बल ७ हजार ३२१ मतांनी धूळ चारत दणदणीत विजय मिळविला. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे आणि मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी विजयाची हॅट््ट्रिक साधली. बालाजीनगर-राजीव गांधी उद्यान या प्रभाग क्र.३८मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय धनकवडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या दिगंबर डवरी यांचा ५ हजार ७६४, राष्ट्रवादीच्या प्रकाश कदम यांनी शिवसेनेच्या विनय कदम यांचा ७ हजार २२८ मतांनी पराभव केला. प्रभाग ३८ पुणे : बालाजीनगर-राजीवगांधी उद्यान प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रकाश कदम, तर भारतीय जनता पक्षाच्या राणी भोसले आणि मनीषा कदम यांनी बाजी मारली. या प्रभागात राष्ट्रवादीची ताकद असल्याने किमान तीन जागांवर तरी घड्याळ चालेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले. ‘अ’ गटातील नागरिकांच्या मागास वर्गात अपेक्षेप्रमाणे धनकवडे यांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेत सहज बाजी मारली. दत्तात्रय धनकवडे यांना १६ हजार १२४ मते मिळवित ५ हजार ७६४ मतांनी सहज विजय मिळविला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दिगंबर डवरी यांना १० हजार ३६० मतांवरच समाधान मानावे लागले. धनकवडी-आंबेगाव पठार या भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किशोर धनकवडे यांनी १६ हजार ९९ मते मिळवित आमदार भीमराव तापकीर यांचा पुतण्या अभिषेक तापकिर यांना (८,७६२) ७ हजार ३३७ मतांनी पराभूत केले. सर्वसाधारण महिला ‘ब’ गटात भजपाच्या राणी भोसले यांनी राष्ट्रवादीच्या वैशाली खुटवड यांचा १५९४ मतांनी पराभव केला. भोसलेंना १२ हजार १२०, तर खुटवड यांना १० हजार ५२६ मते मिळाली. शिवसेनेच्या दीपाली ओसवाल ८ हजार ६४ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. महिला गटात भाजपाच्या मनीषा कदम यांनी १० हजार ९७१ मते मिळवित राष्ट्रवादीच्या मनीषा मोहिते (१०,७२७) यांना पराभूत केले. मनसेचे वसंत मोरे यांच्या पत्नी शकुंतला ७ हजार २०१ मते मिळवित तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. प्रभाग ३९ पुणे : धनकवडी-आंबेगाव पठार परिसरात चारपैकी तीन जागांवर बाजी मारत राष्ट्रवादीने भाजपावर सरशी केली आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी विजयाची हॅट््ट्रिक साधली असून, किशोर धनकवडे व अश्विनी भागवत यांचा हा पहिलाच विजय आहे. विद्यमान नगरसेविका वर्षा तापकीर यांची जागा राखली गेली आहे. आमदार भीमराव तापकीर यांचा गड म्हणून हा भाग ओळखला जातो. त्यांनी यंदा पुतण्या अभिषेकला नागरिकांचा मागास प्रवर्गच्या ‘अ’ गटातून मैदानात उतरविले होते. मात्र, त्याला विजयी करण्यात त्यांना अपयश आले. किशोर धनकवडे यांनी तब्बल १६ हजार ९९ मते मिळवित अभिषेकचा (८,७६२) दणदणीत पराभव केला. शिवसेनेचे अनिल बटाणे ३ हजार ४११ मते मिळवित तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ‘ब’ गटातील महिला मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीच्या अश्विनी भागवत यांनी ११ हजार ४५१ मते मिळवित भाजपाच्या मोहिनी देवकर (११,०४६) यांच्यावर ४०५ मतांनी मात केली. शिवसेनेच्या निकिता पवार यांना ४ हजार ३३८, तर अपक्ष उमेदवार किरण परदेशी यांना २ हजार ४०३ मते मिळाली. ‘क’ गटाच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून विद्यमान नगरसेविका वर्षा तापकीर (१२,१३५) यांनी राष्ट्रवादीच्या श्रद्धा परांडे (१०,४८६) यांचा १ हजार ६४९ मतांनी पराभव केला. ‘ड’ गटातून विशाल तांबे यांनी ११ हजार ६२१ मते मिळवित भाजपाच्या गणेश भिंताडे यांचा (१०,३०८) १,३१३ मतांनी पराभव केला. शिवसेनेचे सुनील खेडेकर ६ हजार २७९ मते मिळवित तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
धनकवडीत घड्याळाचा गजर
By admin | Published: February 24, 2017 3:31 AM