पुणे : आचार्य हेमचंद्रसुरीजी महाराज यांची ९२१ वी जयंती जैन मंदिर आणि स्थानकांमध्ये नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.
श्रुतभवन येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना संत वैराग्यरतिविजयजी म्हणाले की, आचार्य हेमचंद्रसूरिजी जैन परंपरेतीलच नव्हे तर भारतीय शिक्षण परंपरेतील उत्कृष्ट विद्वान होत. अभिजात मराठी भाषेची उत्पत्ती प्राकृत भाषेतून झाली.
हेमचंद्रसूरिजींनी महाराष्ट्री प्राकृतला केंद्रस्थानी ठेवून प्राकृत भाषेचे व्याकरण बनवल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आयुर्वेदात औषधे बनवण्यासाठी वृक्षांचा परिचय देण्यासाठी त्यांनी निघंटु नाममाला तयार केली. हे शास्त्र, औषधी निघंटुमध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाते. योगशास्त्र नामक पुस्तकात त्यांनी हठयोग आणि राजयोगाचे वर्णन केले आहे. ते स्वतः सक्षम योगाभ्यासकर्ता होते. त्यांनी त्यांच्या साहित्यात सत्य आणि समरसतेच्या भावनेचे प्रतिपादन केले.
रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये जी समन्वय भावना प्रकट होत होती तिची सुरवात आ. हेमाचंद्रसूरिजींनी त्यांच्या आचरणातून केली. गुजरातमधील तत्कालीन राजांना त्यांनी आपल्या बुद्धिप्रतिभेने प्रभावित केले. यामुळेच देशात धार्मिक कलह कधीही घडला नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व विकास झाला. हेमचंद्रसूरिजींची साहित्य साधना प्रचंड आणि विस्तृत आहे. पाश्चिमात्य विद्वान त्यांना ज्ञानाचा महासागर म्हणतात, असे संत वैराग्यरतिविजयजी म्हणाले.
चौकट
डॉ. शहा यांचे व्याख्यान
शनिवारी (दि. ५) सकाऴी साडेदहा वाजता कलिकाल सर्वज्ञांची श्रुतसाधना आणि श्रुतरक्षा या विषयावर डॉ. जितेंद्र बी. शाह यांचे व्याख्यान वेबिनारद्वारे आयोजित केल्याचे संयोजकांनी सांगितले.