इंदापूर/लोणी काळभोर : महसूल विभागाने बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत अवैध वाळूउपसा व वाहतुकीवर मोठी कारवाई केली. उजनी पाणलोट क्षेत्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या १५ बोटी उद्ध्वस्त केल्या. तर हवेलीत अनधिकृतपणे वाळूवाहतूक करणाऱ्या १४ ट्रकवर धडक कारवाई केली. दरम्यान, वाळू कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकारावर वाळूमाफियांनी हल्ला केला. बारामतीचे प्रांत, इंदापूर व करमाळ्याचे तहसीलदारांनी उजनी पाणलोट क्षेत्रातील बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या बोटी उद्ध्वस्त केल्या. सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे. इंदापूरच्या तहसीलदार वर्षा लांडगे यांनी सांगितले, गुरुवारी (दि. १२) सकाळपासून कालठण, कळाशी, शिरसोडी येथील नदीपात्रात कारवाई केली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाळूउपसा करणाऱ्या १५ बोटी स्फोटकांनी उद्ध्वस्त केल्या. सोलापूर-पुणे महामार्गावर शेवाळवाडी जकातनाका ते मांजरी बाजार समिती या दरम्यान थांबलेल्या अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या १४ ट्रकवर हवेली तालुक्याचे तहसीलदार व त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री दहा ते पहाटे चार या कालावधीत धडक कारवाई केली. प्रत्येक ट्रकमध्ये चार ते पाच ब्रास वाळू असल्याने सुमारे १५ लाख रुपयांचा महसूल वसूल होण्याची शक्यता तहसील कार्यालयाकडून व्यक्त केली आहे. १२ मे रोजी सायंकाळपर्यंत एकही वाहनमालक अथवा चालक दंड भरण्यास आले नसल्याने पोलिसांना या वाहनांना पहारा द्यावा लागणार आहे. कारवाईप्रसंगी चालकांनी वाहने रस्त्याच्या कडेला सोडून पळून गेलेल्या आठ ट्रकच्या चाकातील हवा महसूल पथकाने सोडून दिली आहे.पुणे जिल्ह्यात फक्त दौंड तालुक्यात पारगाव व पिंपळगाव या दोन ठिकाणी व जुन्नर तालुक्यात बोरी बुद्रुक याठिकाणी वाळूचे लिलाव झालेले आहेत. तरीही पुणे- सोलापूर महामार्गावर दौंड व इंदापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आदेशान्वये कारवाई केली. कारवाई सुरू वाहनधारकांनी वाहने सोडून चावीसह पोबारा केला. मात्र, महसूल पथकाने या वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिल्याने वाहने जागेवरतीच असल्याने त्या वाहनांचा ताबा हडपसर पोलिसांच्या ताब्यात महसूल पथकाने दिला. मार्च महिन्यानतंर वाळू वाहतूकदारांवर हवेलीच्या मंडलाधिकारी विभागात कारवाईच झाली नव्हती. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे संयुक्त कारवाईवर भर दिला आहे. बोटी पळून गेल्या तरी दुसरीकडून त्या परत येऊ शकतात. त्यांना वाव मिळू द्यायचा नाही. याकरिता जास्तीत जास्त बोटींवर कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न रहाणार आहे. कारवाईचा वेग कायम ठेवला जाईल.- वर्षा लांडगे, तहसीलदार
वाळूच्या १५ बोटी, १४ ट्रकवर कारवाई
By admin | Published: May 13, 2016 1:25 AM