शहरातील रस्त्यांवर थुंकणा-या १६० जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 08:17 PM2018-11-10T20:17:26+5:302018-11-10T20:18:11+5:30
गेल्या आठ दिवसांत रस्त्यांवर थुंकणा-या १६० लोकांकडून प्रत्येकी १५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
पुणे : शहरात प्रवास करताना दुचाकी, चारचाकी, बस अथवा पायी चालताना रस्त्यांवर थुंकणे आता तल्लाफबाजांना चागलेच महागात पडणार आहे. महापालिकेच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाअंतर्गत मोहिम हाती घेण्यात आली असून, गेल्या आठ दिवसांत अशा प्रकारे रस्त्यांवर थुंकणा-या १६० लोकांकडून प्रत्येकी १५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यापुढे शहरातील सर्व रस्ते, चौकांमध्ये ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाअतंर्गत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, तसेच शौच करणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी शासनाने प्रत्येक महापालिकेला आपल्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे थुंकणे, घाण, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौचास जाणा-यांना दंड करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वतीने नुकतेच याबाबत करण्यात येणा-या दंडाचे निवेदन जाहीर केले आहे. यामध्ये रस्त्यांवर घाण करणे, कचरा टाक-यांना १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५० रुपये, उघड्यावर लघवी करणा-याला २०० रुपये आणि उघड्यावर शौचास जाणा-यास ५०० रुपयांचा दंड निश्चित केला आहे.
याबाबत मोळक यांनी सांगितले की, शहरातील तल्लाफ बहाद्दरांवर गेल्या आठ दिवसांपासून कारवाई सुरु करण्यात आली आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनाची देखील मदत घेतली जात आहे. गेल्या आठ दिवसांत शहरातील रस्त्यांवर थुंकणा-या १६० लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये केवळ दंड न करता थुंकलेली जागा संबंधित व्यक्तींकडून साफ देखील करून घेण्यात येत असल्याची माहिती मोळक यांनी दिली. यापुढी ही कारवाई नियमितपणे व सातत्याने करण्यात येणार आहे. सुरुवातील रस्त्यांवर थुंकणा-यावर कारवाई करण्यात येत असून, पुढील काळात सार्वजनिक इमारतींमध्ये घाण करणा-यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्योच मोळक यांनी स्पष्ट केले.