ऑनलाइन परीक्षेतील कॉपी बहाद्दरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:06+5:302021-09-27T04:12:06+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान अकराशे विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले असून, विद्यापीठाच्या परीक्षा ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान अकराशे विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले असून, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे संबंधित विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेतल्यामुळे गैरप्रकार करणारे विद्यार्थी पुराव्यांसह सापडले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागल्या. त्यात अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्ये विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब करण्यात आला नव्हता. त्यामुळे परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला व परीक्षांचे निकालही वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रथम आणि द्वितीय सत्राच्या परीक्षांसाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यात तब्बल १ हजार १०० विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले. एक किंवा अधिक विषयांच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये दंड आणि संबंधित विषयांची परीक्षा रद्द करणे, एकापेक्षा जास्त विषयात गैरप्रकार केला असल्यास संबंधित विद्यार्थ्याला अपात्र ठरवून पुन्हा परीक्षा देण्याची कारवाई करण्यात आली आहे.
अभियांत्रिकीचे सर्वाधिक विद्यार्थी
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांमध्ये अकराशे विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले. त्यात सर्वाधिक विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे असून, नियमानुसार विद्यापीठातर्फे संबंधितांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. ऑनलाइन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारांचे पुरावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पुराव्यांची पडताळणी करून संबंधित विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करणे शक्य झाले.