बाजार समिती आवारातील टपऱ्यांवर कारवाईच : बी.जे.देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 08:49 PM2018-06-15T20:49:28+5:302018-06-15T20:49:28+5:30
मार्केटयार्ड परिसरातील अनधिकृत टप-यांचा विषय गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खुद्द पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी टप-यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या मार्केटयार्डमधील सर्व अनधिकृत टप-या काढून टाकण्याचा निर्णय अखेर बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. या सर्व टपरी धारकांना दिलेल्या नोटिशीची मुदत रविवारी (दि. १९ जून) संपत असून बाजाराला अडथळा निर्माण करणा-या या सर्व टप-या काढून टाकण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून कारवाई केल्यास बाजार बंद करु असा इशारा दिला आहे. बाजार बंदची आढाव यांची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी येथे सांगितले.
मार्केटयार्ड परिसरातील अनधिकृत टप-यांचा विषय गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खुद्द पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी टप-यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासंदर्भात समितीही गठीत करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर अनधिकृत टप-यांचा वाहतूक आणि व्यवहारास अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व टप-या काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही देशमुख यांनी नमुद केले. याबाबत देशमुख यांनी सांगितले की बाजारातील फळे, तरकारी, फुले, कांदा-बटाटा आणि भुसार विभागात सुमारे सुमारे १५० टप-या आहेत.यातील १०९ टप-या १९८० पासून अनेक वेळा टप-या काढून घेण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. यातील काही टपरी धारकांकडून बाजार समिती भाडयासाठी शुल्क आकारत आहे. तर नव्याने झालेल्या ४१ टप-यांची कोणतीच नोंद नाही. या सर्व टप-यामुळे बाजाराच्या आवारात वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनेक वेळा वाद देखील निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व टप-या हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
---------------
बाजार आवारातील सर्व टप-या अधिकृत करण्याची मागणी टपरी चालक करत आहेत. प्रशासनाने दिलेल्या नोटीसा व कारवाईच्या विरोधात आंदोलन देखील सुरु केले आहे. तसेच टप-या काढल्यास बाजार बंद पाडण्याची भूमिका घेतली आहे. अनधिकृत टप-यांना संरक्षण देण्यासाठी बाजार बंद करणे म्हणजे शेतक-यांच्या विरोधात भूमिका घेण्यासारखी आहे. त्यामुळे अनधिकृत टप-या वाचविण्यासाठी टपरी चालकांनी शेतक-यांना वेठीस धरू नये, असेही देशमुख यांनी सांगितले.
------------------