पुणे : पर्वती परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार संकेत लोंढेसह त्याच्या ६ साथीदारांविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. टोळीने बेकायदा मार्गाने फायदा मिळवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी करत दहशत निर्माण केली होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी केलेली ही ५३वी मोक्का कारवाई आहे. सतत होणाऱ्या मोक्काच्या कारवाईमुळे सध्या सराईत टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
टोळी प्रमुख संकेत देविदास लोंढे (जनता वसाहत, पर्वती पायथा), प्रतीक उर्फ बिट्या पांडुरंग कांबळे (२०, चुनाभट्टी, सिंहगड रोड), अजित उर्फ आज्या संजय तायडे (२०, जनता वसाहत) आणि शुभम दिगंबर गजधने (१९, दांडेकर पूल) यांच्यासह ३ अल्पवयीन बालकांवर ही कारवाई केली आहे.
सराईत गुन्हेगार संकेत लोंढे याच्याविरुध्द ६ गुन्हे दाखल असून त्याने साथीदार बिट्या कांबळे, आज्या तायडे, शुभम गजधने यांना सोबत घेत संघटित गुन्हे करण्यासाठी टोळी तयार केली. ही टोळी खुनाचा प्रयत्न, दुखापत, अतिक्रमण, बेकायदा जमाव जमवणे, बेकायदा शस्त्र जवळ बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होती.
टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव पर्वतीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना सादर केला होता. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक विजय खोमणे, पोलिस उपनिरीक्षक जगदाळे, दीपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांनी केली.