यवत : दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार रमेश थोरात समर्थक कार्यकर्त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या भर सभेत फटकारल्याने विधान परिषदेत रमेश थोरात यांना संधी मिळण्याकडे आशा लावून असलेल्या समर्थकांना चांगलीच बोलणी ऐकून घेण्याची वेळ आली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या विजयी ठरलेल्या तालुक्यातील आमदार व पक्षकार्यकर्त्यांचे कौतुक केले. मात्र, दौंड तालुक्याचा विषय निघताच अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी रमेश थोरात यांना विधान परिषदेवर घेण्याच्या मागणीचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, दौंड तालुक्यातील सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे. त्यांचा लगेच पंचनामा करणार नाही. गावोगावी जाऊन त्यांची काढणार आहे, असे सांगत असताना समोर बसलेल्या कार्यकर्त्यांमधून रमेश थोरात यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी करण्यात आली. यामुळे अजित पवार यांनी संबंधितांना चांगलेच फैलावर घेतले. पवार म्हणाले, बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? असे करतो ती सरकारमधील तीन मंत्रिपदे त्यांनाच देतो. कशाचं काय.. तिकिटे घेऊन बदाबदा पडताय आणि म्हणे द्या विधान परिषद. रमेश थोरात यांना तिकीट देऊन ज्यांना थांबायला लावले त्यांना काय देऊ? चुना देऊ का चुना? असे तंबाखू मळताना करतात तसे हातवारे करून पवार कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘उगीच मला चिडायला लावू नका. एकदा संधी दिली की त्याचे सोने करायचे की राख करायची हे तुम्ही ठरवायचे, असा सल्ला देत अजित पवार यांनी दौंडच्या थोरात समर्थकांचा समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांचा अगदी काठावर पराभव झाल्यापासून तालुक्यातील त्यांचे समर्थक विधान परिषदेवर थोरात यांना संधी मिळेल ही अपेक्षा ठेवून होते. तालुक्यातील राजकीय पटलावर तशा चर्चादेखील थोरात समर्थक घडवून आणत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत निकटचे सहकारी म्हणून थोरात ओळखले जात असल्याने भविष्यात त्यांना आमदारकीची संधी मिळेल, अशी आशा त्यांचे कार्यकर्ते लावून होते. विधानसभा निवडणुकीनंतर दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांनी ठिकठिकाणी लावलेल्या फ्लेक्सवर आता लक्ष विधान परिषद असा उल्लेख असायचा. मात्र खुद्द अजित पवार यांनीच रमेश थोरात यांना विधान परिषदेवर घेण्याच्या मागणीचा समाचार घेतल्याने थोरात समर्थक हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे दौंड राष्ट्रवादीमधील सुप्त थोरात विरोधक मनोमन खुशीत असल्याचे चित्र आहे.
................. दौंडमधील साडेसहाशे मते सहज फिरवली असती..... इंदापूर तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीवेळी एकूण पाच सभा घेतल्या. दौंडमध्ये सभा घ्यायची का? अशी विचारणादेखील रमेश थोरात यांनी केली होती. पण ते बोलले, नको त्याची गरज नाही. साडेसहाशे मते अजित पवार सहज फिरवू शकतो. पण त्यांना नाही पटले. आता काय करणार? अशी खंतदेखील अजित पवार यांनी बोलून दाखविली.