पुणे : एकीकडे तीस लाख पुणेकर गेले अनेक महिने दिवसाआड पाणीपुरवठा विनातक्रार सहन करीत आहेत. दुसरीकडे मात्र पुण्याच्याच आसपासच्या काही ‘टाऊनशिप्स’मधील रहिवाशांना रोजच्या रोज पाणी मिळते आहे. शहरात पाण्यावरून रण पेटलेले असताना या वसाहतींच्या पाण्याकडे मात्र सगळ्यांनीच सोयीस्कर डोळेझाक केली आहे.पुण्याच्या आसपास गेल्या काही वर्षांत अनेक मोठ्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत. अॅमनोरा पार्क (हडपसर), नांदेड सिटी (सिंहगड रस्ता) व डीएसके विश्व (धायरी) या तीन मोठ्या वसाहती त्यातल्याच आहेत. अॅमनोरा पार्कमध्ये १७ हजार घरे आहेत. नांदेड सिटी, डीएसके विश्वमधील घरांची संख्याही अशीच हजारांमध्ये आहे. या सर्व वसाहतींना खडकवासला धरणातीलच पाणी दिले जाते. त्याच धरणातील पाणीसाठ्याचे एकूण लोकसंख्येचा विचार करून नियोजन होते. पाणी कमी असेल तर सर्वसामान्य पुणेकरांवर लगेचच पाणीकपात लादली जाते. या मोठ्या वसाहतींना मात्र कपातीच्या नियोजनातून वगळले आहे. त्यांचा पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू असून त्यात कसलीही कपात केलेली नाही, अशी टीका विविध राजकीय पक्षांकडून होत आहे.या सर्व वसाहतींची पाणी वितरण व्यवस्था अत्यंत आधुनिक आहे. कच्चे पाणी घेतले जाते. त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रियाही तेच करतात. प्रत्येक घराला मीटर पद्धतीनेच पाणी दिले जाते. त्याचा हिशेब ठेवला जातो. पाणी वाया जाऊ दिले जात नाही. आदर्श अशीच ही पद्धत आहे. मात्र त्यांना धरणातून जे पाणी दिले जाते त्यात कपात करणे आवश्यक होते. ती झालेली नाही, असे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. तीस लाख पुणेकर एक दिवसाआड पाणीपुरवठा सहन करीत असताना या वसाहतींमध्ये मात्र रोज पाणी आहे. तिन्ही वसाहती मिळून वर्षाला साधारण १ टीएमसी पाणी लागते. (प्रतिनिधी)या तिन्ही वसाहती महापालिका हद्दीबाहेर आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीतील निर्णय महापालिका घेऊ शकत नाही. डीएसके विश्व महापालिकेचे पाणी घेत असले तरी ते प्रक्रिया केलेले नसते व त्याचे प्रमाण फार नाही. - व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागप्रमुख
प्रशासनाची डोळेझाक, पाणीकपातीत पक्षपात
By admin | Published: May 07, 2016 5:25 AM