पुणे :पुणे महापालिकेच्या निवडणुका विहित वेळेत घेणे शक्य नसल्याची कबुली राज्य शासनानेच दिली आहे. त्यामुळे १४ मार्चला सध्या अस्तित्वात असलेल्या महापालिकेची मुदत संपताच प्रशासकाचे राज्य सुरू होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेत आयुक्त राजेश पाटील प्रशासक आहेत.
राज्य शासनाने गुरुवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ६, ६(अ)मधील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे ही मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे १४ मार्च २०२२ रोजी मुदत संपत असलेल्या पुणे महानगरपालिका येथे प्रशासकपदी महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात येत आहे. |महापालिकेची विहित मुदत संपताच प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारावा. अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे या आदेशात म्हटले आहे.