पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा १६ महिन्यांपासून पगार देण्यात न आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, संस्थेवर प्रशासक नेमून त्यांच्या आर्थिक कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. या मागण्या मान्य झाल्यास बहिष्कार मागे घेऊन पूर्ववत शिकविण्यासाठी तयार असल्याचे शिक्षकांनी स्पष्ट केले आहे.सिंहगड संस्थेच्या महाविद्यालयांचे कामकाज काही दिवसांपासून बंद आहे. महाविद्यालयातील लेक्चर पूर्ववत सुरू व्हावीत, या मागणीसाठी नुकतेच विद्यार्थ्यांनी उपोषण केले होते. त्याचबरोबर प्राध्यापकांनीही त्यांच्या विविध मागण्यासांठी विद्यापीठात साखळी उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या.सिंहगड टेक्निकल एज्युकेशन संस्थेच्या सर्व २२ महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचे आॅक्टोबर २०१६ पासूनचे प्रलंबित वेतन एकरकमी मिळावे, पगार राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करावा, पुढील पगार दर महिन्याच्या १० तारखेच्या आत जमा करावा, संस्थेच्या संशयित आर्थिक घडामोडींच्या नि:पक्ष तपासणीसाठी प्रशासन नेमण्यात यावी, अशा मागण्या प्राध्यापकांकडून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी त्यांनी गेल्या दीड महिन्यापासून असहकार आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांतील सर्व कामकाज ठप्प झाले आहे.सिंहगड संस्थेने विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी जमा केलेली रक्कम अन्य क्षेत्रात गुंतवली आहे, हे संस्थेच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होते.प्राध्यापकांच्या वेतनासंदर्भात वेळोवेळी संस्थेकडे पाठपुरावा केला; मात्र संस्थाचालकांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. आयकर विभागाने सर्व आर्थिक व्यवहाराला चाप बसविल्याने वेतन देणे शक्य नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. मात्र, प्राप्त झालेल्या कागदत्रांवरून त्यामध्ये तथ्य नसल्याचे दिसून येत आहे.मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठकसिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग व एमबीए महाविद्यालयांबाबत निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. २७) प्राध्यापकांना चर्चेसाठी बोलावले आहे. मुख्यमंत्रीच यावर तोडगा काढू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे प्राध्यापकांनी स्पष्ट केले आहे.बुधवारी व्यवस्थापन परिषदेची बैठकसिंहगडच्या महाविद्यालयांबाबत निर्माण झालेला पेचप्रसंग व इतर विषयांबाबत येत्या बुधवारी (दि. २८ फेब्रुवारी) व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. या बठैकीत सिंहगडच्या प्रश्नांबाबत निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मुकुंद किर्दत यांनी सिंहगडचा तिढा लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली आहे.
सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमावा, आर्थिक कारभाराची व्हावी चौकशी : शिक्षकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 6:45 AM