तळवडे : येथील सॉफ्टवेअर चौकात एका जाहिरात एजन्सिचे होर्डिंग विद्युत वाहिनीवर कोसळले. होर्डिंगच्या वजनाने खांब वाकले. या खांबांवरील उच्चदाबाच्या वीजताराही तुटल्या. मात्र, वीजपुरवठा बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या महिन्यात वाकड परिसरात जाहिरातीचे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात एक महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. तळवडे येथील सॉफ्टवेअर परिसरात सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास उंचावर लावलेले जाहिरातीचे होर्डिंग कोसळले. होर्डिंगच्या वजनाने २२ केव्हीच्या वीजतारा तुटल्या तसेच या तारांचे खांबही वाकले. मात्र वीजपुरवठा बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वीजपुरवठा सुरु असता मोठी दुर्घटना येथे घडली असती.शहर परिसरात जाहिरातींचे होर्डिंग उभारताना पुरेशी दक्षता घेण्याची गरज आहे. उभारलेल्या जाहिरात फलकांना परवानगी देताना त्याची संबधित यंत्रणेने तपासणी केली जावी, अनधिकृतपणे उभारलेल्या फलकांवर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने कारवाई करून असे होर्डिंग काढून टाकावे. तसेच उंचावर लावलेले फलक वाऱ्याच्या दाबामुळे कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यातून सहज हवा निघून जाईल याची दक्षता घ्यावी. जुने व फाटलेले फलक ताबडतोब काढून टाकावेत, अशी मागणी होत आहे.............................तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकात महावितरण कंपनीच्या २२ केव्हीचा विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या आहेत. दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यावर जाहिरातीचे होर्डिंग कोसळले. त्याच सुमारास चिखली येथे दुरूस्तीची कामे करण्यासाठी वीजपुरवठा बंद केला होता. वीजपुरवठा सुरु असता तर या घटनेमुळे प्रचंड नुकसान झाले असते. - अनिल उलसुलकर, कनिष्ठ अभियंता, महावितरण कंपनी......................................................
तळवडेत वीजतारांवर कोसळले जाहिरातीचे होर्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 5:03 PM
गेल्या महिन्यात वाकड परिसरात जाहिरातीचे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता.
ठळक मुद्देवीजतारांचे खांब वाकले : वीजपुरवठा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली