तब्बल बारा वर्षांनी महात्मा फुले समग्र ग्रंथाचे होणार पुनर्प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:42 PM2018-03-30T18:42:29+5:302018-03-30T18:42:29+5:30
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य अनेक वर्षांपासून प्रकाशित झालेले नाही. राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङमय,शेतक-यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती.
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समग्र साहित्य प्रकाशित झालेले नाही. या साहित्य प्रकाशनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तब्बल बारा वर्षांनंतर महात्मा फुले समग्र ग्रंथ पुनर्प्रकाशित होत असून, दोनशे पानांच्या नवीन मजकुरासह हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येत आहे. येत्या ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य अनेक वर्षांपासून प्रकाशित झालेले नाही. राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङमय,शेतक-यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती. मात्र, शासकीय ग्रंथागारात ही पुस्तके कित्येक वर्षांपासून वाचकांना उपलब्ध नाहीत.त्यामुळे फुले दाम्पत्यांच्याजीवनावरील साहित्य लवकरात लवकर प्रकाशित करण्याची मागणी युवा माळी संघटना आणि भिडे वाडा बचाव मोहिमेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्याशी ‘लोकमत’प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, सुरूवातीच्या काळात राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने महात्मा फुले यांच्यावरील पुस्तके प्रकाशित केली होती. १९९१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी २००६ मध्ये दुसरी आवृत्ती आली. त्यानंतर राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून महात्मा फुले प्रकाशन समितीने हे काम स्वत:कडे मागून घेतले. ते ग्रंथ तसेच्या तसे प्रकाशित करणे समितीला सहज शक्य होते. परंतु,आम्हाला ते जसेच्या तसे छापायचे नव्हते. त्यामध्ये नव्याने काही गोष्टी आम्हाला समाविष्ट कराव्याशा वाटल्या. महात्मा फुले यांचे लेखन हे मोडी लिपीत असायचे. त्यांचे शेतक-यांचे आसूड याचे मूळ हस्तलिखित मोडीमध्येच होते. ते तसेच छापले कारण त्याकाळी मोडी जाणणारी अनेक लोकं होती पण नंतर मोडी लिपी जाणणारी लोक कमी होत गेली. त्यानंतर महात्मा फुले समग्र ग्रंथासह त्यांची पुस्तके देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित झाली. आता हा समग्र ग्रंथ नव्याने प्रकाशित करताना त्यामध्ये २०० पानी मजकूर वाढविण्यात आला आहे. महात्मा फुले यांनी गव्हर्नर जनरला जे पत्र लिहिले ती मूळ पत्रे छापण्यात आली आहेत. महात्मा फुले हयात असताना जे ग्रंथ प्रकाशित झाले होते त्या ग्रंथाला कुणाकुणाच्या प्रस्तावना होत्या त्या वगळल्या होत्या. त्या सर्व प्रस्तावनांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. वृत्तपत्रात महात्मा फुले यांनी जे रिपोर्ट लिहिले होते जे आजच्या काळाशीही सुसंगत आहेत त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. महात्मा फुले यांच्या मुलाने लिहिलेले चरित्र, फुलेंचा सयाजीराव गायकवाडांशी झालेला पत्रव्यवहार या गोष्टींच्या समाविष्टतेतून एक परिपूर्ण ग्रंथ करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------