अखेर मुळशी तहसीलदारपदी अभय चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:24 AM2019-02-23T04:24:22+5:302019-02-23T04:24:37+5:30

दोन महिन्यांपासून होते रिक्त पद : रखडलेली कामे मार्गी लागण्याची आशा

After all, Abhay Chavan, Mulshi Tehsildar | अखेर मुळशी तहसीलदारपदी अभय चव्हाण

अखेर मुळशी तहसीलदारपदी अभय चव्हाण

googlenewsNext

पौड : गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त राहिलेल्या व नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागलेल्या मुळशी तालुका तहसीलदारपदाचा कार्यभार अभय चव्हाण यांनी आज (दि.२२) दुपारी स्वीकारला. तहसीलदारांच्या नियुक्तीअभावी महसूल विभागातील अनेक कामे रेंगाळलेली असल्याने नागरिकांची नव्या तसीलदारांची एकदाची प्रतीक्षा संपली. अभय चव्हाण यांच्या नियुक्तीपूर्वी मुळशी तालुक्यात तहसीलदार म्हणून कोण येणार याची बरीच चर्चा सुरु होती. मागील तसीलदारांचे लाचप्रकरण, आगामी ग्रामपंचायत, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका, तालुक्यात जमिनीच्या खरेदी विक्रीतील मोठे गैरव्यवहार या पार्श्वभूमीवर मुळशीच्या तहसीलदारपदी नव्याने कुणाची वर्णी लागते आहे याची सर्वांनाच मोठी उत्सुकता होती.

पदभार स्वीकारण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.महसूल विभागातील कामाची आवड असल्याने पुढील काळात २००७ च्या राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना नायब तहसीलदारपदी नियुक्ती मिळाली होती. सुरुवातीला काही काळ बीड जिल्ह्यातील अतिशय डोंगराळ भागात असलेल्या पाटोदा येथे नायब तहसीलदार म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते २०१३ मध्ये तहसीलदार पदावर औरंगाबाद येथे रूजू झाले. त्यांचे मुळशीच्या तहसीलदारपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात धान्य खरेदी अधिकारीपदी कार्यरत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, मुळशी तालुका हा महसुली कारभाराबाबत अतिशय संवेदनशील तालुका असून महसूल विभागातील भ्रष्टाचाराबाबत दक्षता घेऊन काम करणार आहे. मागील दोन महिन्यात तालुक्यातील महसूल विषयक रेंगाळलेली कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर तालुक्याच्या तुलनेत काही प्रमाणात मागे राहिलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आगामी काळात तालुक्यात राबविणार असल्याची माहिती मुळशीचे नवनियुक्त तहसीलदार अभय चव्हाण यांनी या वेळी दिली.

मुळशी तालुक्यात यापूर्वीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना जमीन व्यवहाराच्या नोंदीवरून एक कोटीची लाच घेतल्याच्या प्रकरणावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन महिन्यांपूर्वी अटक केली होती. यानिमित्ताने तालुक्यातील महसूलविषयक तक्रारी व कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर तालुक्याला तहसीलदार नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. चव्हाण यांच्या कामकाजाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील नागरिक, महसूल विभागातील अधिकाºयांनी गर्दी केली होती. तसेच कामे रेंगाळलेले नागरिक आपले प्रश्न घेऊन भेटत होते. मागील तहसीलदारांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त तहसीलदार अभय चव्हाण यांच्यावर येथील कारभार सुरळीत करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

अभय चव्हाण
यांच्यासमोरील आव्हाने
४महसूल विभाग व उपनिबंधक कार्यालयातील कामाचा समन्वय साधून रेंगाळलेल्या प्रकरणांना गती देणे.
४महसूल विभागात खालपासून वरपर्यंत बोकाळलेला भ्रष्टाचार तसेच एजंटांचा सुळसुळाट कमी करून सामान्य नागरिकांची रेंगाळलेली कामे मार्गी लावणे.
४अनधिकृत खोदकाम व खाण व्यवसायाला आळा घालणे
४राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे
४आगामी ग्रामपंचायत, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पाडणे
४जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणात झालेल्या फसवणुकीची प्रकरणे निकाली काढणे.
 

Web Title: After all, Abhay Chavan, Mulshi Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे