रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड, डॉक्टरांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 10:24 AM2020-02-06T10:24:10+5:302020-02-06T10:24:23+5:30
याप्रकरणी डॉ. सादीक इब्राहिम खान (वय २९, रा. वेलफेअर हॉस्पिटल, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे : रुग्णावर व्यवस्थित उपचार केला नसल्याचा आरोप करीत रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना मारहाण करीत तोडफोड केली. कोंढवा येथील आशिर्वाद चौकातील वेलफेअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री सव्वादहा वाजता हा प्रकार घडला.
याप्रकरणी डॉ. सादीक इब्राहिम खान (वय २९, रा. वेलफेअर हॉस्पिटल, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, डॉ. सादीक खान व डॉ. जुबेर सय्यद हे ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता हॉस्पिटलमध्ये असताना शोएब अन्सारी (रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांना त्यांचे नातेवाईक वेलफेअर हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यांच्या छातीमध्ये त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सय्यद यांनी तपासणी करुन त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाल्याचे व पेशंटच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्यात आले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता डॉ. सय्यद यांनी पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यास सांगितले. त्यावेळी नातेवाईकांनी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांना नवले हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचे सांगत पेशंटला घेऊन गेले.
या घटनेनंतर रात्री सव्वा दहा वाजता डॉ. खान हे पेशंटांना तपासत असताना चार ते पाच जण आले. त्यांनी डॉ. खान यांना ‘तुमने शोएब अन्सारी के उपर अच्छी तरहसे ट्रिटमेंट नही किया. इसलिए वह मर गया है’ असे म्हणून त्यांना व हॉस्पिटलमधील स्टाफला शिवीगाळ केली. डॉ. खान यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. हॉस्पिटलचा मुख्य काचेचा दरवाजाची तोडफोड केली. हॉस्पिटलमधील बसण्याचे बाकडे उलटे पालटे केले. तेथील लँडलाइन फोन उचलून जमिनीवर आपटला. त्यानंतर तेथे गर्दी होऊ लागताच ती मुले पळून गेली.
डॉ. खान यांच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्युशन (प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स अँड डॅमेज आर लॉस टु प्रोपर्टी) अॅक्ट नुसार ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.