पुणे : संसारवेलीवर एक नवीन पालवी फुटल्यानंतर वैवाहिक आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण होतं, असं म्हणतात. मात्र दोघे तब्बल अठरा वर्षे या सुखापासून वंचित होते. चार गर्भपात आणि चार नवजात बालकांचा मृत्यू पाहिल्यानंतर जोडपं काहीसं खचून गेलं होतं. 2018 मध्ये पुन्हा आशा पल्लवित झाल्या. पण गर्भावस्था अत्यंत जोखमीची आणि गुंतागुतींची होती. मात्र वैद्यकीय तज्ञांच्या टीमने हे आव्हान यशस्वीपणे पेलत पहिल्या आठ यशस्वी प्रयत्नांनंतर पस्तीस वर्षीय महिलेला मातृत्वाचा आनंद दिला. ही कहाणी आहे, अनिता आणि वीरेंद्र्र त्रिपाठी यांची. दांपत्याचे पहिले बाळ हे 2002 साली दगावले. त्यानंतर दर दोन वर्षांनी त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. पुणे आणि दिल्लीतील अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. त्यांचे प्रसूतीचे रिपोर्ट्स सामान्य असायचे, पण बाळ जगत नव्हते. पण या जोडप्याने आशा सोडल्या नाहीत. जून २०१८ मध्ये त्या गरोदर राहिल्या. त्यांची गर्भावस्था अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची होती. सात महिन्यांनी (२८ आठवडे) अचानक उल्बद्रव बाहेर आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. भ्रूणाचा मेंदू सुरक्षित राहावा आणि फुफ्फुसे परिपक्व राहावीत यासाठी त्यांना औषधे देण्यात आली. त्याचप्रमाणे संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिजैविके देण्यात आली. त्याचप्रमाणे तत्काळ प्रसूती होऊ नये यासाठीही औषधे देण्यात आली. ११ जानेवारी २०१९ रोजी अनिता यांची मुदतपूर्व प्रसूती होऊन मुलाला जन्म दिला. त्यावेळी त्याचे वजन १.३ किलो होते. तब्बल अठरा वर्षांनंतर त्यांच्या चेह-यावर मातृत्वाचा आनंद ओसंडून वाहात होता. हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार प्रसूतीतज्ञ आणि मॅटर्नल-फेटल मेडिसीन एक्स्पर्ट डॉ. राजेश्वरी पवार, निओनॅटोलॉजिस्ट डॉ. सचिन भिसे, हॉस्पिटलमधील प्रमुख निओनॅटोलॉजिस्ट आणि एनआयसीयूचे इन-चार्ज डॉ. तुषार पारिख यांनी ही जोखीम पत्करत या दांपत्यांच्या रूक्ष आ़युष्यात नंदनवन फुलविले. निओनॅटोलॉजिस्ट डॉ. राजन भिसे म्हणाले, जन्मल्यानंतर बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्याला डिलीव्हरी रूममध्ये तत्काळ श्वसन साहाय्याची गरज होती. बाळाला निओनॅटल आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि आधुनिक नॉन-इन्व्हेसिव्ह (छेद द्यायची आवश्यकता नसलेल्या) तंत्राच्या साहाय्याने श्वसनास साह्य देण्यात आले. बाळाचे वजन एका महिन्याने १.७ किलो झाले आणि त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. ...............प्रसूती लांबवणे आमचे उद्दिष्ट होते. कारण जगातील कोणत्याही इनक्युबेटरपेक्षा गर्भाशय हे सर्वोत्तम इन्क्युबेटर असते. पण भ्रूणाचे संरक्षण करण्यासाठी पाणी नसल्याने बाळाल संसर्ग होणार नाही आणि इतर कोणतीही गुंतागुंत निर्माण होणार नाही, याची खातरजमा करण्यात आली. ३० व्या आठवड्यात प्रसूती करण्यात आली, कारण गर्भाशयात बाळाला धोका असल्याची चिन्हे दिसू लागली- डॉ. राजेश्वरी पवार.....................
मुदतपूर्व प्रसूतीच्या प्रकरणांमध्ये माता वेळेत टर्शरी पेरिनॅटल सेंटरमध्ये आल्या तर बाळाचा जीव कशा प्रकारे वाचवता येऊ शकते, मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांना वेळेवर उपचार मिलाले तर बाळांचा जीव वाचवता येऊ शकतो आणि ती बाळे सामान्य आयुष्य जगू शकतात, याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. - डॉ. तुषार पारिख,प्रमुख निओनॅटोलॉजिस्ट आणि एनआयसीयूचे इन-चार्ज मदरहूड हॉस्पिटल ..............आई होण्यात ८ वेळा अपयशी ठरल्यानंतर मी उद्धवस्त झाले होते. जेव्हा मी ९ व्या खेपेस गरोदर होते तेव्हा बाळाच्या जिवंत राहण्याबाबत मी साशंक होते. मी नेहमी भीतीच्या सावटाखाली असे आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याची खात्री वारंवार डॉक्टरकडून करून घेत असते. जेव्हा मी माझ्या बाळाचा आवाज पहिल्यांदा ऐकला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आम्ही १८ वर्षे याच क्षणाची वाट पाहत होतो. आम्ही आमचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे- अनिता त्रिपाठी