पुणे : ''चार पिढ्यानंतर आता आमच्या दारात पाणी आलंय, नाय तर त्या डोंगराहून पाणी आणावं लागायचं बाबा ! आमी कसं बी पालापाचोळा खाऊ पण पाण्याचं काय करणार बा ! उन्हा-तान्हाचं आम्हाला किती तरी मैल पाण्यासाठी हिडावं लागायचं. पण आता दारात पाणी पाहून लय आनंद व्हतंय बाबा !'' या भावना आहेत सुलाबाई ढेबे यांच्या. पुण्यापासून साधारण ८० किलोमीटर अंतरावरील वेल्हे तालुक्यातील पोळे या दुर्गम भागामधील धनगरांची वस्ती असलेले गाव आहे. धनगर समाजातील अनेक घरे इथे आहेत. गेल्या अनेक वषार्पासून हे लोक या ठिकाणी ते राहत आहेत. गेले अनेक वर्षे पाण्यासाठी रोज दोन ते तीन किलोमीटर अंतर डोंगरात पायपीट करून धनगर लोक घरात पाणी आणतात. तसेच पाणी नाही म्हणून नाईलाजाने तरूण वर्गास वस्ती सोडून शहराकडे कामाचा शोधात जावे लागत आहे. पाण्याच्या अभावी दुभती जनावरेही दूध देईनाशी झाली. इथे एका उंच डोंगराळ भागात एक जीवंत झरे असलेले मोठे टाके आहे. या भागातून डोंगरात जाऊन पाणी आणायचे म्हणजे खूप जिकिरीचे काम आहे. ही सर्व स्थिती टेलस आॅर्गनायझेशन संस्थेचे लोकेश बापट व जान्हवी बापट यांनी पाहिली. तेथे प्रत्यक्ष जाऊन या लोकांच्या घरापर्यंत पाणी कसे आणता येईल, ते पाहिले. टेलस ऑर्गनायझेशन व देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे यांच्या एकत्रितपणे येथे पाईप लाईन व पाण्याच्या टाक्या सुलाबाई रामचंद्र ढेबे, रामभाऊ ढेबे यांच्या घराच्या अंगणात पाण्याची व्यवस्था करून दिली.
वेल्हा तालुक्यात काही कामानिमित्त मी माझ्या गाडीने जात होतो. तेव्हा एका आजीबाई मला रस्त्यातून चालताना दिसल्या. त्या दळण करण्यासाठी पायपीट करत होत्या. त्यानंतर त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या अनेक समस्या उलगडल्या. त्यात पाण्याची समस्या गंभीर असल्याचे समोर आले. डोंगरावरून पाणी आणावे लागत असल्याचे पाहिले. त्यामुळे त्यांच्यासाठी २६०० फूटांची पाइपलाइन टाकून त्यांच्या दारात पाणी आणले. - लोकेश बापट, टेल्स ऑर्गनायझेशन संस्था
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही डोंगरावरील टाकवेतून पाणी आणतोय. तिथं जीवंत झरा असल्याने बारामाही पाणी असते. त्यामुळे आमच्या जगण्यासाठी ते टाकवे हेच आवश्यक बनले आहे. कारण इतर कुठेही पाणी नाही. परंतु, आता पाइपलाइन झाल्याने आम्हाला डोंगरावर जाऊन पाणी आणावे लागणार नाही. - रामभाऊ ढेबे, ग्रामस्थ, पोळे गाव