दीपक जाधव ।पुणे : रात्रशाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या १४५६ शिक्षकांची सेवा शासनाने मे २०१७ मध्ये एका परिपत्रकाद्वारे संपुष्टात आणली. त्याला ७ महिने उलटून गेले, तरी त्या जागी पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असताना त्यांना शिकवायला शासनाने शिक्षकच दिलेले नाहीत. यामुळे रात्रशाळांत शिकणाºया विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.हॉटेल, गॅरेज, मॉल, दुकाने आदी ठिकाणी काम करणाºया हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे बंद पडलेले शिक्षण रात्रशाळांमुळे पुन्हा सुरू करता येते. रात्रशाळांमधून शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर गेलेल्यांची संख्याहीमोठी आहे. देशात रात्रशाळा ही संकल्पना राबविणारे महाराष्टÑपहिले राज्य आहे. त्यानंतर इतर राज्यांनी याचे अनुकरण करून रात्रशाळा सुरू केल्या; मात्र या रात्रशाळा व महाविद्यालये बंद पाडण्याची परिस्थिती सध्याच्या शासनाकडून निर्माण केली जात आहे.राज्यात १७६ अनुदानित रात्र शाळा-महाविद्यालये असून, त्यामध्ये ३३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये २१०० शिक्षक कार्यरत होते, त्यापैकी दुबार नोकरी करणाºया १४५६ शिक्षकांची सेवा संपुष्टात आणण्यात आली. त्या शिक्षकांच्या जागांवर पर्यायी शिक्षकांची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. राज्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचेरात्रशाळेमध्ये समायोजन केले जाईल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार काही जागांवर डी.एड. पात्रताधारक शिक्षक पाठविण्यात आले; मात्र ८ वी ते १२ वी साठीचे बी.एड.चे शिक्षक शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.दहावी व बारावी ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष आहेत. त्यांची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही अद्याप त्यांना गणित व इंग्रजी विषयांचे शिक्षक उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. रात्रशाळांमध्ये शिक्षणाची ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थी त्यांच्या शिक्षणालाच रामराम करण्याची भीती निर्माण झाली.सुरुवातीच्या काळात दिवसा इतर शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक रात्रशाळांमध्ये जाऊन जादाचे वर्ग घेत होते. त्याबदल्यात शासनाने त्यांना या कामाचे अर्धे वेतन देण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार दिवसा शिकविणाºया शिक्षकांना रात्रशाळेत नोकरी करण्याची मुभा देण्यात आली; मात्र तडकाफडकी निर्णय घेऊन दुबार शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली. रात्रशाळांबाबत इतका महत्त्वाचा निर्णय घेताना त्याची कोणतीही पूर्वतयारी शासनाने केली नाही.हलाखीच्या परिस्थितीमुळे रात्रशाळेतून शिक्षणपुणे शहरात आबासाहेब अत्रेरात्र प्रशाला व महाविद्यालय, पूना नाईट हायस्कूल व कॉलेज, जोसेफ नाईट स्कूल, पुणे मनपा नि. बा. किंकर रात्र प्रशाला, चिंतामणी रात्र प्रशाला व महाविद्यालय आहे. येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.गावाकडे अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने पुण्यात कामधंदा करण्यासाठी अनेक मुले, तरुण आले आहेत. इथं हॉटेल, गॅरेज, दुकानांमध्ये नोकºया करून, ते रात्र शाळेत शिक्षण घेत आहेत.सर्व शिक्षा अभियानाचे ढोल बजावणाºया शासनाकडून या मुलांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.त्यांचा पगार कुठून देणार?रात्रशाळा व महाविद्यालयांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर तात्पुरते शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न काही संस्थांकडून केला जात आहे; मात्र एका शिक्षकाला किमान दहा हजार रुपये वेतन द्यावे लागते.एका शाळेमधील किमान ८ ते १० शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या शिक्षकांच्या वेतनापोटी दरमहा लाख रुपये खर्च करण्याचा भार या संस्थांना उचलणे अवघड आहे.
रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना सोडले वा-यावर, शिक्षक घेतले काढून : पर्यायी व्यवस्थाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 6:27 AM