कुंटणखाणा चालविण्यासाठी घर देणार्या महिलेला दोन वर्षांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:46 PM2017-10-27T14:46:16+5:302017-10-27T15:08:11+5:30
कुंटणखाना चालविण्यासाठी घर देणार्या महिलेला गुन्हा घडल्यापासून तब्बल दोन वर्षांनी फरासखाना पोलिसांनी अटक केली. तिची २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पुणे : कुंटणखाना चालविण्यासाठी घर देणार्या महिलेला गुन्हा घडल्यापासून तब्बल दोन वर्षांनी फरासखाना पोलिसांनी अटक केली. तिला २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राप यांनी दिला आहे.
सुरेखा शुक्राचार्य कांबळे (वय ३९, रा. खटाव, ता. मिरज, जि. सांगली) असे पोलीस कोठडी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात कुंटणखाणा चालक ज्योती नागाप्पा कट्टीमणी आणि सचिन द्वारकानाथ घोणे (वय ४०, दोघेही, रा. बुधवार पेठ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. रेखा गगूंबाई कांबळे (रा. बुधवार पेठ) ही यामध्ये फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी ११ एप्रिल २०१४ रोजी बुधवार पेठेत ही कारवाई करून दोन पीडित मुलीची मुक्तता केली होती. त्यापैकी एक मुलगी पश्चिम बंगालची होती. तर एक बांग्लादेशातील होती. या प्रकरणी पोलिसांनी सुरेखा हिला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी केली.