पुणे : केंद्र सरकारने लष्करामध्ये अग्निवीर ही पध्दत आणली. त्यामुळे लष्कराला दुर्बल केले जात आहे. ही पध्दत रद्दच केली पाहिजे. खरंतर महाराष्ट्रातही भाजपने दोन अग्निवीर आणले आहेत. त्यामध्ये एक अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे आहेत. दोघांनाही चार वर्षे दिली असून, दोन-दोन वर्षे त्यांना आहेत,’’ असा टोला काॅंग्रेसचे स्टार प्रचारक व ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी लगावला.
काॅंग्रेस भवन येथे शुक्रवारी (दि.२६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते.
निरंजन टकले म्हणाले, केंद्र सरकारने अतिशय वाईट काम केले असून, देशावरील कर्ज वाढवले आहे. यापूर्वी २५ हजार कोटींचे सोने गहाण ठेवण्याचे कर्ज होते, ते आता १ लाख २५ हजार कोटींवर पोचले आहे. यावरून लक्षात येईल १ लाख कोटीच्या कर्जाचा बोजा देशावर वाढवला आहे. तसेच देशात रोजगार देऊ असे त्यांनी आश्वासन दिले होते. पण उलट लोकांना बेरोजगार केले. आता तर लष्करातही हीच योजना अग्निवीर नावाने आणली आहे. त्याने लष्कर दुबळे होणार आहे. ही योजना रद्द झालीच पाहिजे.’’
सध्या माध्यमांवर दबाव टाकून त्यांच्यावर बंधने घातली जात आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा ज्येष्ठांना संपवले. कोणी आपल्याला प्रश्न विचारू नये म्हणून त्यांनी संसदेतील प्रश्नोत्तरांचा तासच बंद केला. दुसरीकडे देशात धार्मिकतेवरून द्वेष पसरवला जात आहे. त्यांना संविधान बदलाचे आहे आणि मनुस्मृतीप्रमाणे देश चालवायचा आहे. पण पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आणि त्यांचे धाबे दणाणले आहे. ते केवळ टीका करताना दिसत आहेत. पण सरकारने गेल्या काही वर्षांतील ध्येय साध्य केली, त्यावर काहीच बोलत नाहीत. कारण त्यांनी काहीच काम केलेले नाहीय. त्यामुळे भाजपला देशात चारशेपार नाही तर दोनशेपर्यंत जागा मिळतील.’’