"त्यांनी पण प्रलोभन दाखवलं, तुम्ही आम्हालाच..."; सरकारी योजनांवरुन अजित पवारांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 04:19 PM2024-11-30T16:19:20+5:302024-11-30T16:26:14+5:30
सरकारी योजनांवरुन बाबा आढाव यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महात्मा फुले वाडा येथे ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव यांनी गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून विविध महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बाबा आढाव यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचा आरोप केला. विविध योजनांमधून प्रलोभनं दाखवण्यात आल्याचेही बाबा आढाव यांनी म्हटलं. जनतेच्या तिजोरीतून सरकारने बहिणींना भाऊबीज दिल्याचे आढाव म्हणाले. यावरुन आता अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. देशभरात फुकट योजना दिल्या जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं.
बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावरूनही अजित पवार यांनी भाष्य केलं. यासोबत अजित पवार यांनी देशभरात मोफत देण्यात येणाऱ्या योजनांवरुन विरोधकांवर निशाणा साधला.
"पैशाचा वारेमाप वापर झाल्याचे म्हटलं जात आहे. त्यासंदर्भात व्हिडीओ आणि बाकीच्या गोष्टी आहेत. जर कुठे झालं असेल तर यंत्रणा आहे. बाकीच्या राज्यांमध्ये ज्या प्रकारे बुथ कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालं नाही. तुम्ही म्हणता की प्रलोभन दाखवलं. लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच अर्थमंत्री होतो. मीच त्यावेळी अर्थविभागाच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचं आहे. लाभ गरिबांना द्यायचा असून जात पात धर्म बघायचा नाही. मी बसलो तेव्हा साडेसहा लाख कोटींचे बजेट होतं. त्यातून मी ७५ हजार कोटी बाजूला काढण्यासाठी सांगितले. ४५ हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी, १५ हजार कोटी वीज माफीसाठी द्यायचे ठरवलं आणि बाकीचे उर्वरित योजनांसाठी ठरवले. मला अर्थखात्याच्या लोकांनी सांगितले जर यामध्ये १० टक्के बचत केली तर आपले पाच ते सात हजार कोटी रुपये वाचतात. त्यावेळी मी आपण करु असं म्हटलं. मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय आहे,"
"ते सगळे जनतेचे पैसे होते. अंतुले साहेबांनी त्यावेळी संजय गांधी निराधार योजनेतून ६० रुपये द्यायला सुरुवात केली होती. आज आम्ही त्याचे १५०० रुपये करुन घेतले आहेत. निराधार लोकांना तेव्हापासून आजपर्यंत पैसे चालू आहेत. ते कुठे बंद केले आहेत. आम्हाला शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की माझ्या इथे लाडली बैहना ही योजना लोकप्रिय झाली. कर्नाटकमध्येही काँग्रेसने योजना सुरु केली. त्यांनी एसटी सेवा मोफत दिली आणि आता ताण आला असल्याचे म्हणत आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना फुकट दिल्या. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही तर १५०० रुपये दिले. त्यांच्या जाहीरनाम्यात तर ३००० करुन त्यांनी पण प्रलोभन दाखवलचं ना. तुम्ही आम्हाला दोष देत आहात. ते तीन लाख कोटी देणार म्हणाले होते. पण एवढे पैसे ते देऊच शकणार नाहीत हे मलाही माहिती होतं," असंही अजित पवार म्हणाले.