बारामती (पुणे) : बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जखमी झालेले जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रुग्णालयात उपचाराच्याही सुचना दिल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीतासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगावकडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक होऊन तावरे खाली पडले. त्यानंतर काही वेळातच तिथून कन्हेरीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली गाडी थांबवण्याच्या सूचना चालकाला दिल्या. हे तर रामभाऊ, असं म्हणत तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत तावरे याना बसवले, सोबत काही लोक दिले आणि दवाखान्यात पाठवले.
तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अशातही क्षणाचा विलंब न लावता अजितदादांनी स्वतः पुढे होत दाखवलेली ही तत्परता सर्वांना भावली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना देखील रामभाऊ तावरे यांच्या उपचाराबाबत कळवले. देवकाते पती पत्नीला काळजीचे काही कारण नाही असं सांगत दिलासा दिला.