बारामती : बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या माळेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीवर अखेर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे जयदीप विलास तावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र चव्हाण यांचा एक मताने पराभव करत कमळाचा झेंडा फडकविला. भाजपचे जयदीप विलास तावरे यांना नऊ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र चव्हाण यांना आठ मतं मिळाली. सरपंचपदाच्या निवडीमुळे गेली महिनाभर चाललेली राजकीय उलथापालथ आज थांबली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं याच ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये निवासस्थान आहे. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
गेली दोन महिने सरपंच निवडीचं नाट्य रंगलं होतं. मावळते सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना ठरवून दिलेला कार्यकाळ संपून गेला होता. मात्र त्यांनी राजीनामा न दिल्याने राष्ट्रवादीचेच काही सदस्य नाराज झाले होते. अखेर अजित पवारांनी शिष्टाई करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना थोडाच काळ यश आलं.
दरम्यान, माळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गेली अडीच वर्षे "राष्ट्रवादी'चे जयदीप दिलीप तावरे हे कार्यरत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून त्यांनी 26 डिसेंबर रोजी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच्या कालावधीत राष्ट्रवादीचा सरपंच होण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी ग्रामपंचायतीत लक्ष घातले होते. त्यांनी पक्षाचे नेते बाळासाहेब तावरे, कार्यकर्ते रविराज तावरे, रणजित तावरे, सभापती संजय भोसले, रमेश गोफणे यांच्यावर जबाबदारी सोपविली होती; तर भाजपच्या बाजूने रंजन तावरे, स्वरूप वाघमोडे यांनी व्यूहरचना निर्णायक कशी ठरेल, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
सरपंचपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनपेक्षितपणे "राष्ट्रवादी'चे नेतृत्व झुगारून सदस्य अशोक सस्ते, विजयमाला पैठणकर, रवींद्र वाघमोडे या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या नेतेमंडळींशी हातमिळवणी केली. त्याचा पुरेपूर फायदा घेत भाजपच्या नेतेमंडळींनी बहुमतासाठी लागणारे 9 सदस्य अज्ञातस्थळी पळविले. त्याचे पडसाद आजच्या सरपंचपदाच्या निवडणुकीवर स्पष्टपणे दिसून आले.