मोरगाव (पुणे) : राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाऊन एक महिना झाला. नव्या सरकारने विकास कामांना स्थगिती दिली. मात्र पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. राज्यातील शेतकरी अतीवृष्टीमुळे अडचणीत असताना अजून मंत्रीमंडळ अस्तित्वात आले नसल्याचे खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोरगाव (ता. बारामती) येथे केले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, सध्याचे सरकार हे केवळ दोघांचे आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी अतीवृष्टीमुळे अडचणीत असताना ठोस निर्णय घेतला जात नाही. याबाबत राज्यपालांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या सरकारने विकास कामांना खीळ घातली असली तरी पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपस्थितांना दिले.
अष्टविनायकापैकी पाच मंदिर पुणे जिल्ह्यात आहेत. मोरगावचे मंदिर हे अष्टविनायकाचे प्रथम तीर्थक्षेत्र असल्याने त्याचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. येथे दिवसेंदिवस येणाऱ्या भक्तांची पर्यटकांची संख्या लक्षात घेता नव्याने मोरगांवचा विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. विकास कामे करताना नाराजी व अडचणी येत असतात. सरपंच निलेश केदारी यांनी सातत्याने पाठपुरावा करुन केलेल्या विकास कामांबाबत कौतुक पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोमनाथ कदम तर प्रस्ताविक सरपंच निलेश केदारी यांनी मानले.
बारामती, पुरंदर व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरंदर उपसा सिंचन योजना ही संजिवनी ठरत आहे. यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्या मार्फत बारामती तालुक्यासाठी ही योजना चालवण्याची तयारी अजित पवार यांनी दर्शविली. एक महिन्यात त्या संदर्भात कामाचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे विविध विकास कामांचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाइस चेअरमन नंदकुमार होळकर, सरपंच निलेश केदारी, उपसरपंच नेवसे, माजी सरपंच पोपट तावरे, किरण गुजर, मा.जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, भरत खैरे, हनुमंत भापकर, दत्तात्रय ढोले, मुरलीधर ठोंबरे, भाऊसाहेब कांबळे, अमृता गारडे आदी मान्यवर उपस्थित होते. येथील अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय नुतनीकरण, जल शुद्धीकरण केंद्र आदी विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.