मावळ (पुणे): दहशत निर्माण करण्यासाठी सध्या मंत्री, नेते, कार्यकर्त्यांची चौकशी करत असून केंद्र सरकारची ही बोगसगिरी सुरू आहे. केवळ भीती निर्माण करून बदनामी निर्माण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने कारवाई केली. आठ-आठ दिवस नेत्यांच्या नातेवाईकांच्या घरी कारवाई ही लोकांना घाबरवण्यासाठी केली जाते. यंत्रणेचा कितीही वापर केला तरी महाविकास आघाडीतील मंत्री नेते, कार्यकर्ते याला घाबणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवत्ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. वडगाव मावळ येथे अल्पसंख्याक विभागीय कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबीरासाठी ते आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
समीर वानखेडे हा भाजपचा म्होरक्या असून तो बोगसगिरी करतो. प्रसिध्दीसाठी लोकांना अडकवण्याचे काम करीत आहे. या बोगस केसेस आहेत. त्या न्यायालयात टिकणार नाहीत. येणा-या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संर्दभात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समज आहे, असा आरोप मलिक यांनी केला.
पुढे बोलताना मलिक म्हणाले, बंगालच्या निवडणुकीत हेच हत्यार त्यांनी वापरले तिथल्या जनतेने त्यांना त्याच पध्दतीने उत्तर दिले. महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी हे पाहत आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात भाजपची परिस्थिती तशीच होणार आहे. केंद्र सरकार हे जुलमी सरकार आहे. बंगालने धडा शिकवला आहे. आगामी काळात बंगाल, महाराष्ट्र व पंजाब ही तिन्ही राज्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही.