"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 03:41 PM2024-11-30T15:41:41+5:302024-11-30T15:54:31+5:30

शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली.

Ajit Pawar went to Baba adhav protest site and presented his position on EVMs | "जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल

"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल

Ajit Pawar : ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. विधानसभा निवडणुकीत सरकारी पैशांचा वापर झाला असून ईव्हीएमबाबत संशय घेण्यास जागा असल्याचे बाबा आढाव यांनी म्हटलं आहे. आज सकाळी शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार हे देखील आंदोलनाच्या स्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
 
"संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या प्रमाणे बाबा आढाव यांनी आपलं मत मांडले. काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी तर काही सुप्रीम कोर्टाशी संबधित आहेत. त्यामुळे त्यांना जे योग्य वाटतं त्यानुसार त्यांनी निकाल दिले आहेत. खरंतर वयस्कर लोकांना मतदार केंद्रावर जाऊन त्रास होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने ८५ वर्ष्यांच्या व्यक्तींच्या घरी जाऊन मतदान करण्याची योजना राबवली होती. लवकर अंधार होत असल्याने लाईटची सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आली होती," असं अजित पवार यांनी म्हटलं.

"लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्या. आमच्या १७ जागा आल्या. हा जनतेचा कौल असल्याचे आम्ही मान्य केलं. त्यावेळी ईव्हीएमबद्दल कुणी बोललं नाही.बारामतीमध्ये मी जो उमेदवार उभा केला होता तो ४८ हजार मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच सात महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीत मीच ४८ हजारांची भर काढून १ लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनताच म्हणत होती लोकसभेला ताईला आणि विधानसभेला दादाला. त्यामध्ये जनतेने कुणाचं ऐकलं नाही. जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार," असा सवाल अजित पवार यांनी केला.

"१९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकांनी वाजपेयींना मतदान केलं आणि विधानसभेला विलासराव देशमुखांना केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मतदार लोकसभेला शरद पवारांना आणि विधानसभेला मला मतदान करत होता. तरीही शरद पवारांना ८५ हजार तर मला ५० हजारांचे मताधिक्य मिळालं. त्यावेळी मी असं म्हटलं नाही की मला २५ हजार मते कमी का पडली. हा लोकांचा कौल होता आणि तो मान्य केला पाहिजे," असंही अजित पवार म्हणाले.

"काही पराभूत उमेदवार मला सांगतात की आमचा पराभव झाला. मी त्यांना सिद्ध करुन दाखवा असं सांगतो. नाना पटोले परवा म्हणाले की संध्याकाळी कसं मतदान वाढलं. साडेचार आणि पाचच्या पुढे लोक रांगेत आले मग त्यांना आतमध्ये घेतलं. माझ्या इथे सकाळी सात ते नऊ पाच टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर मतदान संपेपर्यंत टक्केवारी १५ टक्क्यांनी वाढली. त्याला आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी रांगेत यायचं आणि कधी मतदान करायचं तेच ठरवणार," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
 

Web Title: Ajit Pawar went to Baba adhav protest site and presented his position on EVMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.