- भानुदास पऱ्हाड
आळंदी : भाजपाला मागील अनेक वर्षांपासून पवार विरुद्ध पवार हा संघर्ष उभा करायचा होता. मात्र तो त्यांना उभा करायला जमत नव्हता. दुर्दैवाने अजितदादांच्या माध्यमातून भाजपाने हा संघर्ष उभा केला आहे. खरंतर भाजपने अजितदादांच्या माध्यमातून हा शेवटचा प्रयत्न केला असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र आळंदीतील केळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. याप्रसंगी 'मी सेवेकरी' सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, युवक अध्यक्ष ऍड. विशाल झरेकर, कार्याध्यक्ष ऍड. देविदास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार रोहित पवार म्हणाले, सद्यस्थितीत अजितदादा मतदारांना भावनिक साद घालत आहेत. वास्तविक त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. खरंतर दादांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्य लोकांना तसेच पवार कुटुंबालासुद्धा अजिबात पटलेला नाही. 'मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर मला वेगळं काही तरी मिळालं असतं, हे अजितदादांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. खरंतर पवार साहेबांनी त्यांना उपमुख्यमंत्री तसेच इतर प्रमुख मंत्रीपदे दिली. महाराष्ट्रातले प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी ही दादांकडे दिली होती. मग आणखी वेगळं काय द्यायला पाहिजे. मग आता तुम्ही पदासाठी भाजपात गेले का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
लोकसभा निवडणूका तोंडावर आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हेच आमचे उमेदवार असतील. मात्र बारामती लोकसभा मतदार संघात विरोधी गटाने अधिकृत रित्या उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतरच त्याविरोधात आवश्यक ती रणनीती आखून प्रचाराला सुरुवात करणार आहोत.
- रोहित पवार, आमदार.