पिंपरी : वर्षभर विवाहांचे मुहूर्त गाजत असताना संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात मात्र गेल्या आर्थिक वर्षात फक्त ४ हजार ३२७ विवाहनोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार १९२ इतकी नोंदणी ‘ड’ प्रभागात झाली आहे. विवाहनोंदणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. विवाहबंधनातून एकमेकांची मने जुळली असली, तरी त्याची कागदोपत्रीदेखील नोंद असणे आवश्यक असते.विवाहनोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात क्षेत्रीय कार्यालयांत विवाहनोंदणीचे कामकाज चालते. नागरी सुविधा केंद्रातून अर्ज घेऊन अथवा आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची तपासणी केली जाते. त्यानंतर वधू-वर, पुरोहित, दोन साक्षीदार यांना विवाहनोंदणीसाठी अपॉर्इंटमेंट दिली जाते. ठरवून दिलेल्या दिवशी सर्व मंडळी हजर राहिल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी आणि नोंदणी करून विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र दिले जाते. यापूर्वी विवाहनोंदणीच्या प्रक्रियेबाबत नागरिक अनभिज्ञ होते. कोणती कागदपत्रे लागतात, ती कोठे जमा करायची, प्रमाणपत्राची कोठे आवश्यकता भासते याबाबत सहज माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात दर बुधवारी हे प्रमाणपत्र घेण्यासाठी वधू-वर हजर असल्याचे चित्र दिसते. अजूनही अनेक नागरिकांमध्ये विवाहनोंदणीबाबत जागृती झालेली नाही. नवीन दाम्पत्य असल्यास तातडीने नोंदणी करतात. मात्र, अनेकांना याबाबत माहितीच नाही. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या कामावेळी अडचण निर्माण होते. यासाठी नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. शहरातील जोडप्यांनाही यापूर्वी विवाहनोंदणीसाठी दुय्यम निबंधक अथवा विवाह निबंधक कार्यालयात पुण्यात, पिंपरीत जावे लागायचे. एकाच ठिकाणी ही व्यवस्था असल्याने यंत्रणेवर ताण यायचा. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यासाठी महिनोन् महिन्यांचा कालावधी लागायचा. मात्र, नंतर विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था महापालिका स्तरावर करण्यात आली. सध्या हे कामकाज प्रभाग स्तरावर चालत आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत हे पत्र दिले जाते. (प्रतिनिधी)नोंदणी शुल्क आकारणी विवाहास तीन महिने झाले असल्यास पन्नास रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. त्यानंतर वर्षभरापर्यंत दीडशे रुपये आणि एक वर्षाच्या पुढे अडीचशे रुपये शुल्क आकारले जाते. विवाह नोंदणीबाबत जागृती नाहीअनेक जोडप्यांमध्ये विवाहनोंदणीबाबत जागृती झालेली नाही. अनेकांना याबाबत माहितीच नाही. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या कामावेळी अडचण निर्माण होते.नोंदणीसाठी थांबावे लागते तासन्तासविवाहनोंदणीसाठी बुधवारची अपॉइंटमेंट दिली जाते. नोकरदार व्यक्ती रजा टाकून नोंदणीसाठी हजर राहतात. मात्र, महापालिका मुख्यालयातील बैठका, विविध कामांच्या ठिकाणी भेटी देणे आदी कारणांमुळे क्षेत्रीय अधिकारी वेळेवर कार्यालयात नसतात. त्यामुळे त्यांची वाट पाहत ताटकळावे लागते. यासह अनेकदा सॉफ्टवेअरमध्ये देखील बिघाड असल्याने नोंदणीस उशीर होतो. त्यामुळे अपॉइंटमेंट घेऊनही फायदा होत नाही. ‘ड’ प्रभागात सर्वाधिक नोंदगेल्या वर्षभरात महापालिकेच्या ‘ड’ प्रभागात सर्वाधिक विवाहनोंदणी झाली आहे. या प्रभागात आयटी कंपन्या असल्याने येथे नोकरीसाठी अथवा परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. त्यासाठी विवाहनोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने अनेकांकडून तातडीने नोंदणी करून घेतली जाते.
विवाह नोंदणीला वाटाण्याच्या अक्षदा
By admin | Published: April 24, 2016 4:28 AM