संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्यासाठी आळंदी नगरपालिका सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:20 PM2017-11-07T13:20:55+5:302017-11-07T13:25:20+5:30
आळंदी यात्रेदरम्यान भाविकांसाठीच्या आरोग्यविषयक उपाययोजना तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत.
आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या ७२१व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात आळंदी यात्रेदरम्यान भाविकांसाठीच्या आरोग्यविषयक उपाययोजना तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात डेंगीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना तसेच यात्रेला आलेल्या भाविकांना याचा फटका बसू नये यासाठी आळंदी नगर परिषदेकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. ११ नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रेला सुरुवात होणार असून, १४ नोव्हेंबरला एकादशी तर १६ नोव्हेंबरला माऊलींचा संजीवन सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी अलंकापुरीत देवस्थान व नगर परिषदेकडून कार्तिकीची जय्यत तयारी केली जाणार आहे.
सोहळ्यापूर्वी आळंदी शहराच्या संपूर्ण परिसरात जेटिंग मशीनद्वारे औषधांची फवारणीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. शहरातील बंद व खुल्या गटारांमध्ये मशीनच्या मार्फत औषधांची मात्रा फवारण्यात आली आहे. त्यातील जीवजंतू नष्ट करण्यात आले आहेत. तुंबलेली गटारे उपसणे, कचराकुंड्या रिकाम्या करणे, कचर्याची विल्हेवाट लावणे, ठिकठिकाणी डिसीन फेक्टो, कार्बोलिक पावडर फवारण्याची कामे सुरु आहेत. शहरातील मुख्य ठिकाणी वाढलेले गवत कामगारांच्या साह्याने काढले जाणार आहे. कार्तिकी सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासून भाविकांचे आरोग्य रोगमुक्त ठेवण्यासाठी चार टप्प्यांत प्राधान्य देऊन काम केले जाणार आहे.
कार्तिकी सोहळ्याला अलंकापुरीत लाखो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे गर्दी होऊन शहरातील प्रमुख रस्ते मोठ्या स्वरूपात अस्वच्छ होत असतात. अस्वच्छ परिसरामुळे भाविकांना प्रदक्षिणा घालताना तोंडाला रुमाल लावण्याची वेळ येते. भाविकांच्या या समस्यांचा विचार करून परिसर व शहर कचरामुक्त तसेच स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने आता कंबर कसली आहे.