चाकण, खेड परिसरातील सर्व उद्योगधंदे सुरू, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 02:25 PM2020-05-05T14:25:51+5:302020-05-05T14:32:33+5:30
लॉकडाऊनमध्ये किंचित शिथिलता असली तरी नागरिकाना काटेकोर नियमांचे पालन करावे लागणार...
राजगुरूनगर : चाकण व खेड परिसरातील ६५५ पैकी १०९ कारखाने यापूर्वीच सुरु झाले आहेत.दोन दिवसांत सर्व कारखाने सुरु करण्यात येणार आहेत.तसेच राजगुरुनगर शहर व परिसरात मंगळवार(दि.५) पासून १७ मेपर्यंत हॉटेल,मॉल,सलून,चहाचे दुकान,स्वीट मार्ट,पानटपरी वगळता इतर सर्व व्यावसायिकांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दुकाने उघडी ठेवता येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी संजय तेली यांनी दिली.
खेड तालुक्यातील दारूची दुकाने सकाळी ७ ते दोन याच वेळात सुरु राहतील. परमिट रूम,बियर बार चालविण्यास पूर्णपणे बंदी आहे. तसेच सर्व प्रकारच्या बांधकामांना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रांतधिकारी तेली म्हणाले की,पुणे जिल्हा रेड झोन आहे. कोरोना रुग्ण नसला तरी लगतचा तालुका म्हणून खेड ऑरेंज झोनमध्ये आहे.म्हणून यापुढील लॉकडाऊनमध्ये किंचित शिथिलता असली तरी नागरिकाना काटेकोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी ६५ वर्षावरील आणि १० वर्षांखालील व्यक्तीना पूर्णपणे मज्जाव आहे.दुचाकीवर एक आणि चारचाकीत चालकासह चौघेजण ये-जा करू शकतील.सार्वजनिक अथवा कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला मास्क बंधनकारक आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा चोवीस तास सुरु राहतील.सकाळी सहा ते नऊ या वेळात दुध खरेदी विक्री करता येणार आहे. हायवेवरील ढाबे वगळता सर्व हॉटेल पार्सलसह पूर्णपणे बंद राहतील. असे संजय तेली यांनी सांगितले.
...........................
कामगार व कुटुंबाची उपासमार होईल या भीतीपोटी आणि हाताला काम नसल्याने पर जिल्हा व परप्रांतीय कामागारांचे लोंढे गावाकडे निघाले आहेत.त्यांना जाण्याची सुविधा निर्माण करून देतानाच जागेवर थोपविण्याच्या हेतूने तालुक्यातील सर्व कारखाने सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.कामगारांची ३३ टक्के उपस्थिती,सोशल डिस्टन्सिंग व नियमात प्रवास करून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे.एक तासाचे अंतर ठेऊन दिवसभरात दोन शिफ्टमध्ये कारखाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.