पुणे: कोरोना विषाणूला प्रतिबंध व्हावा म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुर्व भागात दुकाने दोनच तास खुली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या अंगलट आला आहे. या भागातील मानसिकता लक्षात घेता दुकाने दोन तासांऐवजी २४ तास खुली ठेवा अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.काही मिळत नाही किंवा फक्त याच वेळेत मिळणार आहे म्हटले की झुंबड करून ते खरेदी करण्याकडे या भागातील बहुसंख्याकांचा कल आहे. त्यामुळेच दुकाने फक्त दोनच तास खुली राहणार, रेशनिंग वर धान्य फुकट मिळणार असे समजल्यावर गर्दी करून खरेदी केली जात आहे. त्यातच प्रशासानाने फक्त जीवनावश्यक वस्तू व त्याही दोनच तिस मिळतील असे जाहीर केल्यावर त्या दोन तासात सर्वच पुर्व भागात दुकांनांमध्ये गर्दी ऊसळली.त्यामुळेच आता या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दुकाने २४ तास खुली ठेवण्याची मागणी करत आहेत. कसबा पेठेतील क्रुष्णा दुध डेअरीचे संचालक सुनिल व प्रकाश कोकाटे म्हणाले, प्रशासनाला या भागाची मानसिकता माहिती नाही. मिळत नाही म्हटले की ते आपल्याला मिळालेच पाहिजे, इतरांपेक्षा लवकर मिळाले पाहिजे अशी इर्शा जागी होते. सगळे घरच मुलांसह रांगा लावण्यासाठी बाहेर पडते. एका घरातील तीनतीन लोक दोनदोन दुकांनांसमोर रांगा लावतात. हे बंद करायचे असेल तर दुकाने कमी वेळेऐवजी जास्त वेळ खुली ठेवावीत. कधीही मिळते म्हटले की लोक वेळ होईल तसे जाऊन खरेदी करतील.
याच पूर्व भागात गेली २५ वर्षे सामाजिक काम करणारे रिक्षा पंचायतीचे नितीन पवार म्हणाले, प्रशासन या भागात चुकीच्या पद्धतीने ऊपाय राबवत आहे. दुकाने दिवसभर खुली ठेवावीत व प्रत्येक परिसराला दिवसाच्या काही वेळा निश्चित करून द्याव्यात. म्हणजे गर्दी होणार नाही. प्रशासनाच्या या ऊपायांमुळे इथल्या लोकांना जगणे अवघड झाले आहे. दूध किंवा धान्य मिळाले नाही, दळण मिळाले नाही तर खायला काय करून घालायचे असा प्रश्न महिला वर्गासमोर आहे. पुरवून पुरवून तरी किती दिवस खाणार. संपले की हालचाल करावीच लागणार आहे, तर साठा करून ठेवण्याची मानसिकता आहे. त्याला आवर घालायचा तर इथल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या गरजेनूसार प्रशासनाने काम करावे. त्यांचा ऊद्देश अर्थातच योग्य आहे, मात्र त्याची अंमलबजावणी अयोग्य सुरू आहे असे पवार म्हणाले.