पुणे : दिल्लीतील कामांमुळे आम आदमी पार्टीची (आप) ओळख आता काम करणारा पक्ष अशी झाली आहे. महाराष्ट्रात आम्ही त्यामुळेच सर्व महापालिका लढवणार आहोत अशी घोषणा आपच्या वतीने करण्यात आली.
पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना आप च्या प्रदेश कार्यकारिणीने भेट दिली. प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे, शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, किशोर मध्यान, धनंजय शिंदे, विजय कुंभार यावेळी उपस्थित होते. दिल्लीत आपची सत्ता आहे. पंजाबामध्ये प्रमुख विरोधी पक्ष आहोत. महाराष्ट्रात काही ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवले. त्यामुळेच आता राज्यात सर्व महापालिका लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्लीत घडू शकते तर महाराष्ट्रात का नाही असेच आता जनतेला वाटत आहे. त्याचाच आपल्याला उपयोग होईल. सत्ता स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी हाच आपचा विचार आहे व तो लोकांना पसंत पडतो आहे असा दावा सर्व पदाधिकाऱ्यांनी केला.
भ्रष्ट्राचार हा निवडणूकीतील आमचा प्रमुख मुद्दा असेल. पुण्यात, पिंपरीत काय झाले ते लांच्छनास्पद आहे. दिल्लीत आम्ही लाईट पाणी रस्ते अशा मुलभूत सुविधांवर भर दिला. भ्रष्ट्राचार झाला नाही तर त्याचे दर कमी करता येतात. हे आप ने दिल्लीत सिद्ध करून दाखवल्याचे राचूरे म्हणाले. आम्ही बोलत नाही, करून दाखवतो, त्यामुळे महापालिकांमध्ये यश नक्की मिळणार असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.